जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । मागील गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंधात वावरणाऱ्या राज्यातील जनतेला गुडीपाडव्याच्या दिवशी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे गुडीपाडव्याच्या दिवशी कोविडचे निर्बंध पुर्णपणे हटवले जाण्याची शक्यता आहे. आज अथवा गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. निर्बंध शिथील केले तरी मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे.
राज्यातील कोविड व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
साधारण महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंधातून मुक्ती होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण गुडीपाडव्याच्या दिवशीचं सगळ्यांना ही खूशखबर मिळणार आहे. महाराष्ट्रात कोरोना साथीच्या दरम्यान राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर असलेले सगळे निर्बंध देखील हटणार आहेत. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण विपुल प्रमाणात आहे.
दरम्यान, गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येतात. तर, रामनवमी निमित्तानेदेखील मिरवणुका निघतात. शोभायात्रांसाठी निर्बंध शिथील करण्याची मागणी करण्यात येत आहेत. त्याबाबतही नवीन सूचना येत्या एक-दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत.