जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । एरंडोल येथील गजमल नगरात किरकोळ कारणावरून भांडण झाल्यामुळे तीन महिला व एक पुरुषाने मिळून एका महिलेच्या डोक्यावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना 22 मार्च घडली होती. गंभीर जखमी महिलेवर जळगाव येथे उपचार सुरू आहे. जखमी महिलेने दिलेल्या जबाबानुसार 23 मार्च रोजी एरंडोल पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
याबाबत सविस्तर असे की, गजमल नगरात आशाबाई दत्तात्रय चौधरी (वय 45) ही महिला पती व दोन मुलांसह राहते. 22 रोजी महिलेचे पती दत्तात्रय चौधरी हे बकरी बांधण्यासाठी जात असतांना, त्यांच्या घरासमोरील मनिषा सपकाळे, ममता सपकाळे, मोना सपकाळे व दीपक मेहराळे यांनी आशाबाई व त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारल्यावर तिघांनी आशाबाईंना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
तसेच घरातून विळा आणून आशाबाई चौधरी यांच्या डोक्यावर वार केला. तसेच चौघांनी मिळून मारहाण केली. आशाबाई चौधरी गंभीर जखमी झाल्यामुळे बेशुद्ध झाल्या. शेजाऱ्यांनी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्यांना जळगावला हलवले. जखमी आशाबाई चौधरी यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल झाला.