⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | हुश्श.. ४२ कोटींच्या प्रस्तावाला शासनाचा हिरवा कंदील, महापौरांचा पाठपुरावा यशस्वी

हुश्श.. ४२ कोटींच्या प्रस्तावाला शासनाचा हिरवा कंदील, महापौरांचा पाठपुरावा यशस्वी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाचा समावेश असलेल्या ४२ कोटींच्या कामाचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला होता. नगरविकास खात्याकडून अद्याप त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नसल्याने कुठेतरी धाकधूक होती. मार्च २०२२ अखेर मंजुरी न मिळाल्यास रस्त्यांची कामे पुन्हा रखडणार अशी शक्यता होती. दरम्यान, सोमवारी नगरविकास खात्याने प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याने पुढील मार्ग मोकळा झाला आहे. महापौर जयश्री महाजन यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला असून महापौरांनी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे व पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेला मिळालेल्या ४२ कोटीच्या कामांच्या निविदेवर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याचे मंत्री ना.एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाल्याशिवाय कामांना ग्रीन सिग्नल मिळणे अशक्य होते. ३१ मार्चच्या आत ही सही न झाल्यास पावसाळ्याआधी जळगाव शहरातील रस्ते बनणार नाहीत अशी धाकधूक नागरिकांच्या मनात होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेमध्ये ४२ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली होती. यामध्ये जळगाव शहरातील प्रमुख रस्ते डांबरीकरण करण्याचे प्रस्ताव महासभेने बहुमताने पारित केला होता.

२०१९ साली राज्य शासनाच्या ४२ कोटींच्या प्रस्तावामध्ये अनावश्यक कामे घेण्यात आली होती. म्हणून प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली होती. जळगावची परिस्थिती लक्षात घेता केवळ आवश्यक कामांचा समावेश करून हा प्रस्ताव पुन्हा सादर करावा असे आदेश प्रशासनाने दिले होते. कामांच्या निवडीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.

समितीने शहराची परिस्थिती आणि गरज लक्षात घेता. ४२ कोटींच्या प्रस्तावामध्ये केवळ आवश्यक कामांचा समावेश केला. ज्यामध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांचा समावेश होता. हा प्रस्ताव महासभेसमोर मंजूर करण्यात आला व महाराष्ट्र राज्य शासनाचा बांधकाम विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. सर्व पूर्तता केल्यानंतर प्रस्तावावर नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी होणे आवश्यक होते.

आगामी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. सोमवारी सकाळीच नगरविकास विभागाकडून ४२ कोटींच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. महापौर जयश्री महाजन यांनी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे रखडल्याने जळगावकर बेहाल झाले होते. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने शहरातील मुख्य रस्त्यांची कामे लवकरच सुरु होऊन जळगावकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.