जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । के. सी. ई सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त “योगा: महिलांच्या आरोग्याची संजीवनी” या विषयावर महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी सेलतर्फे संबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अंड नॅचरोपॅथी मु. जे विद्यालयातील प्रा. गीतांजली भंगाळे, कार्यशाळा समन्वयक व सुक्ष्मजीव विभाग प्रमुख प्रा. संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. गीतांजली भंगाळे यांनी योगा: महिलांच्या आरोग्याची संजीवनी या विषयांवर विस्तृत माहिती दिली. बालपण, गरोदरपणा, रजोनिवृत्ती हे स्त्री जीवनातील तीन महत्त्वाचे टप्पे पार करून निरोगी, निरामय जीवनासाठी योगा महत्त्वपूर्ण संजीवनी असल्याचे सांगितले.
पीजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांनी महिलांच्या आरोग्यासाठी योगा उपयुक्त असल्याचे सांगितले. आधुनिक युगातील महिलांनी सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्या शरीराची काळजी व निरोगी जीवनासाठी योगा करायला पाहिजे असे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.
प्रा. संदीप पाटील हे कार्यक्रमाचे समन्वयक होते,सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे स्त्रियांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे . शारीरिक आजारांसोबत मानसिक आजारांचे वाढलेले प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. या सर्व आजारांबाबत माहिती आणि जनजागृती आणखी वाढली पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप पाटील तर आभार डॉ. स्नेहल देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रूपाली चौधरी यांनी केले. महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी व विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रम घेतले.