जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२२ । जळगाव शहरातील कांचननगर परिसरात राहणाऱ्या एका शाळकरी मुलाने मकरसंक्रांतीच्या दिवशी गळफास घेत आत्महत्या (Suiside) केली होती. दरम्यान, आज त्या मुलाचे वडील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदान शिलाईच्या कामावर असताना त्यांनी गळफास घेतला. मुलाच्या मृत्यूच्या विरहातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रमेश सुकलाल राजपूत (वय ४८) असे मयत इसमाचे नाव आहे.
कांचननगरातील रमेश राजपूत हे बुधवारी नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामावर गेले. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून भरत प्रजापत यांच्या दुकानामध्ये बारदान शिलाईचे काम करत होते. सकाळी अन्य कर्मचाऱ्यांसोबत शिलाईसाठी बारदान त्यांनी काढले. परंतु, बरे नाही वाटत, मी आत जाऊन झोपतो असे म्हणून रमेश राजपूत हे दुकानाच्या आतमध्ये गेले. अन्य कर्मचारी बाहेर बारदान शिलाईचे काम करीत होते. काही वेळाने कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, रमेश राजपूत हे बऱ्याच काळापासून बाहेर आले नाहीत. त्यांनी आत जाऊन बघितले असता, रमेश राजपूत हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
रमेश राजपूत यांचा १३ वर्षीय मुलगा यश याने मकरसंक्रांतीच्या दिवशी किरकोळ कारणावरून गळफास घेतल्याची घटना घडली होती. या घटनेपासून मयत यशचे वडील रमेश हे तणावात असल्याचे मित्रांनी व कुटुंबीयांनी सांगितले. राजपूत यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
दीड महिन्यापुर्वी मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. राजपूत कुटुंबीय त्या घटनेच्या दुःखातून सावरत नाही तोच हा दुसरा आघात झाला आहे. मुलाच्या आत्महत्येनंतर घरातील कमावता व कर्ता पुरूष गेला. या घटनेमुळे नातेवाइकांनी रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. मयत रमेश राजपूत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.