फर्दापूरजवळ धावत्या कारने घेतला पेट, भुसावळचे सहा जण बचावले
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । फर्दापूर येथील बसस्थानकाजवळील पुलावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. चालकाने सावधगिरी बाळगून कारमधील ६ जण खाली उतरल्याने जीवितहानी टळली.
अभिजित नरवडे (रा. गजानन महाराजनगर, भुसावळ) हे भुसावळ येथून कारने (एमएच २० डीजे २१०७) भुसावळवरून औरंगाबादला वडील भारत नरवडे, आई, बहीण, चार वर्षांची भाची व एक नातेवाईक महिला असे एकूण सहा जण मावशीच्या मुलीच्या लग्नाला जात होते. कार फर्दापूरला आल्यावर कारमधून अचानक धूर येत असल्याचे अभिजित नरवडे यांना दिसले. त्यांनी कार बसस्थानकाजवळील पुलावर थांबवली व कारचे बोनेट उघडण्याचा प्रयत्न केला. ते उघडले नाही व आग सुरू झाली. त्यांनी सावधगिरी बाळगत लागलीच कारमधून सर्वांना बाहेर काढले.
सर्व सामान बाहेर काढले. त्यांनी जवळच असलेल्या भारत पेट्रोल पंपावर जाऊन अग्निरोधक यंत्र आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले व कार खाक झाली. दरम्यान, कारमालकाचे सात लाखांचे नुकसान झाले आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.