⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

ZP Election : जळगाव तालुक्यात गुलाबरावांना कशी टक्कर देणार शिवसेना?

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । जळगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आमदार तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आता शिवसेनेच्या शिंदे गटात गेले आहेत. यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. कारण त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे चित्र बदलणार आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. जळगाव तालुक्यात शिवसेना पदाधिकारी हे शिंदे गटात तर कार्यकर्ते हे ठाकरे गटात आहेत. अश्या वेळी या दोघांपैकी नक्की कोण जिंकणार हे काळ ठरवेल. (Jalgaon ZP News)

गुलाबराव पाटील हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. या आधी ते पालकमंत्री देखील होते. यामुळे त्यांनी जिल्हा परिषद गट व गणावर पकड ठेवली आहे. गेल्या अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात निधी दिल्याने ही पकड अधिक घट्ट झाली आहे. दुसरीकडे चाेपड्याच्या आमदार लता सोनवणे यांच्या कुटुंबाचे तालुक्यात राजकीय वजन असल्याने त्याचाही फायदा शिंदे गटालाच मिळणार आहे. शिवसेेनेची ताकद वाढल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीला याची धास्ती होती; मात्र गुलाबरावांच्या बंडामुळे जळगाव तालुक्यात शिवसेना थंड पडणार आहे. असे चित्र आहे.

बंडखाेरीमुळे तालुक्यात सेना नेतृत्वहीन हाेऊ नये याचे प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यातील काही समर्थक, पदाधिकारीही त्यांच्या सोबत जातीलही. तसे झाल्यास सेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांवरच सेनेचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.मात्र शिवसेनेत अजून बंडाळी होईल असे वाटत नाही. तरी जर अजून बंडाळी झालीच तर मात्र शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. मात्र आता शिवसेनेत कोणताही नेता राहिला नसल्याने आता स्थानिक समर्थक, पदाधिकाऱ्यांनाच शिवसेनेच नेतृत्व करायचं आहे.