जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । पाराेळा शहराच्या पाणीपुरवठ्यात येणाऱ्या अडचणी दूर करुन या संदर्भात आमदार चिमणराव पाटील यांनी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव सादर केला हाेता, त्यांनी त्याची तातडीने दखल घेतली. आमदार पाटील व पारोळा बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांना २५ रोजी बोलावून पारोळा शहरासाठी तब्बल ४६ कोटींची पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश मंत्री शिंदे त्यांच्याकडे प्रदान केला.
शहरातील महत्वाचा व ज्वलंत विषय म्हणजे पाणी. बोरी धरणात मुबलक पाणीसाठा असून ही गेल्या कित्येक दशकापासून ८ ते १० दिवसाआड पाणी मिळणे, वेळेवर पाणी न येणे, वारंवार तांत्रिक अडचणींमुळे पाणी उशिरा मिळणे, गढूळ व अशुद्ध पाण्यामुळे वाढती रोगराईने शहरवासीय चांगलेच त्रस्त झाले होते. परिणामी शहरवासीयांनी यासाठी अनेकदा हंडा मोर्चा, आंदोलनेही केली, मात्र त्याचे काहिही फलित शहरवासीयांना प्राप्त झाले नाही. आजपर्यंत शहरवासीयांना याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्वच अडचणींतून शहरवासीयांना मुक्त करावे व शहरात शिरपूर पॅटर्न राबवून शुद्ध व वेळेवर पाणीपुरवठा करून शहराचा पाणीप्रश्न कायमचा दूर व्हावा ही दूरदृष्टी ठेवून आमदार पाटील यांनी पहिल्या दिवसापासून पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा केला.
या पाणीपुरवठा याेजना मंजुर होण्यासाठी लागणार विलंब, त्यातील त्रुटी, उद्भवणाऱ्या अडचणींची माहिती जाणून घेतली. यानंतर सर्व त्रुटी व अडचणींच्या पूर्ततेसाठी आमदार पाटील यांनी ३ जानेवारी २०२२ रोजी तातडीने समन्वय समितीची बैठक घेतली. या बैठकीत पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी उद्भवणाऱ्या त्रुटी व अडचणींचा पूर्ततेसाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना मार्गदर्शक सूचना केल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेत तातडीने त्रुटींची पूर्तता पूर्ण केली. त्यानंतर हा परिपूर्ण प्रस्ताव आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे सादर करून नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला. या प्रस्तावाची मंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेतली.
२५ रोजी आमदार चिमणराव पाटील व पारोळा बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांना शासकीय दालनात बोलावून पारोळा शहरासाठी तब्बल ४६ कोटींची पाणीपुरवठा योजनेचा प्रशासकीय मान्यता आदेश मंत्री शिंदे यांनी त्यांच्याकडे प्रदान केला आहे.