जळगाव जिल्हाजळगाव शहरशैक्षणिक

मू. जे. महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । मराठी भाषा हे आपल्या अस्मितेचे प्रतिक आहे. आपली सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवण्यात भाषेचा मोठा वाटा आहे. मराठी लेखक आणि जनसामान्यांनी मराठी भाषेच्या विस्तार आणि विकासात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. महाराष्ट्रीयन माणूस म्हणून आपण प्रत्येकाने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कृतीशील प्रयत्न केले पाहिजे असे मत मू. जे. महाविद्यालयाच्या भाषा प्रशाळेचे संचालक डॉ. भूपेंद्र केसूर यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मू. जे. महाविद्यालयाच्या मराठी विभाग, साहित्य, कला आणि सांस्कृतिक मंडळ, संगीत विभाग आणि नृत्य विभागाच्या वतीने गीत-संगीत-नाट्य- अभिवाचन यांचा कलात्मक आविष्कार असलेला ‘प्रतिभात्रयी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर हिमानी पिले हिने गणेश वंदना आणि मृण्मयी तोंडूलकर व वैष्णवी कोळी यांनी सरस्वती वंदना सादर केली.

इ.स.२०२२ हे वर्ष कवयित्री शांता शेळके, नाटककार वसंत कानेटकर आणि कविवर्य वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या तीनही साहित्यिकांच्या साहित्यावर लिहिलेल्या लेखांचे ‘प्रतिभात्रयी’ या हस्तलिखिताचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात गगन सदन तेजोमय, सदैव सैनिका, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती या वसंत बापट लिखित गीतांचे सादरीकरण संगीत विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केले. नृत्य विभागाच्या मृण्मयी तोंडूलकर, दिया बनसोडे, रोशनी शुक्ला या विद्यार्थिनीनी ‘ढोलकीच्या तालावर-कुण्या गावाचं आलं पाखरू-रेशमाच्या रेघांनी’, ‘डोल डोलतय वाऱ्यावर’, ‘मी हाय कोळी या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘स्वातंत्र्यांची गौरवगाथा’ या विषयावरील नाटिका यावेळी सादर केली. ब्रिटीशांच्या राजवटीत सुरु झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास या नाटिकेतून मानसी शर्मा, चंचल धांडे यांच्या चमूने सादर केला. त्यानंतर कार्यक्रमात ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेचा भावाविष्कार’ या संकल्पनेवर आधारित ‘काव्य अभिवाचन’ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कवी बा. सी. मर्ढेकर यांची ‘दवास आलीस भल्या पहाटी’ ही कविता जया पाटील हिने, बा. भ. बोरकर यांची ‘लावण्यरेखा’ ही कविता वैष्णवी पाटील हिने, बहिणाबाई चौधरी यांची ‘खोप्यामंदी खोपा’ ही कविता चंदन भामरे याने, कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविता श्रीराम राठोड याने, शिरीष पै यांचे हायकू समीक्षा बोरसे हिने, इंदिरा संत यांची ‘कुब्जा’ ही कविता चंचल धांडे हिने, वसंत बापट यांची ‘ये उदयाला नवी पिढी’ ही कविता मानसी शर्मा हिने, शांता शेळके यांची ‘पैठणी’ ही कविता काजल दळवी हिने, नारायण सुर्वे यांची ‘कामगार आहे मी’ ही कविता दीपक नाईक याने, मंगेश पाडगावकर यांची ‘सांगा कसं जगायचं’ ही कविता राधिका बोरसे हिने, सुरेश भट यांची ‘गे मायभू तुझे मी’ ही कविता रोहिणी अशोक पाटील हिने. दि.पु. चित्रे यांची ‘देवा ह्याही देशात पाऊस पाड’ ही कविता गोपाळ बागुल याने, विंदा करंदीकर यांची कविता ‘घेता’ ही कविता रोहिणी अजाबराव पाटील हिने, भालचंद्र नेमाडे यांची ‘हे लांबच लांब रस्ते’ ही कविता सिद्धी उपासनी हिने, ना. धो. महानोर यांची ‘ह्या नभाने ह्या भुईला’ ही कविता मीनाक्षी ठाकूर हिने, ग्रेस यांची ‘आई’ ही कविता जया पाटील हिने, तर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावरील कविता सिद्धि उपासनी हिने, मराठी भाषेविषयीची कविता डॉ. विलास धनवे यांनी या कार्यक्रमात सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. गोपीचंद धनगर यांनी केले.

शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आधारित नृत्य

कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आधारित नृत्याविष्कार रुशाली पाटील, गायत्री गुरव, मनस्वी भोई, स्नेहा मोरे, नयना अग्रवाल, वैष्णवी कोळी यांनी सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, सामाजिकशास्त्रे प्रशालेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे उपस्थित होते. यावेळी डॉ. भाग्यश्री भलवतकर, डॉ. लक्ष्मण वाघ, डॉ. नाशिकेत सूर्यवंशी, प्रा. गणेश सूर्यवंशी, श्री. चंद्रकांत भंडारी, प्रा. कपिल शिंगाने, प्रा. देवेंद्र गुरव, डॉ. अतुल पाटील, अजय शिंदे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंचल धांडे हिने तर आभार डॉ. योगेश महाले यांनी मानले.

Related Articles

Back to top button