जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली असून हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. गुरुवारी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक जारी केल्यानंतर जिल्ह्यातील तीन विद्यार्थी त्याठिकाणी अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी प्राप्त झाली आहे. त्यात दोन भावी डॉक्टर व एक खेळाडूचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेली आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर त्याठिकाणी अडकलेल्या भारतीयांना पुन्हा आपल्या देशात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील कुणाचे नातेवाईक असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले होते. पहिल्या दिवशी तीन विद्यार्थ्यांच्या पालकांनी संपर्क केला आहे.
युक्रेनमध्ये सध्या पातोंडा (ता. चाळीसगाव) येथील क्षीतिजा गजानन सोनवणे, चाळीसगाव येथील प्रसन्न संजीव निकम हे अडकले आहेत. हे दोघे युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. तर तिसरा विद्यार्थी सौरभ विजय पाटील (रा. महाबळ कॉलनी, जळगाव) नॅशनल युर्निव्हसीटी ऑफ स्पार्टस ॲन्ड फिजिकल एज्युकेशनचे शिक्षण घेत आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाला वरील विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी ती मंत्रालयात कळविली आहे. तेथून केंद्र शासनाला, नंतर युक्रेनमधील भारतीय दूतावासाला कळविली जाईल. जेणेकरून या विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यास मदत होणार आहे.