दुर्दैवी : डीजेच्या वाहनाच्या धक्क्याने भिंत कोसळली, बालक ठार, तिघे जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील वाडी येथे मिरवणुकीत डीजेचे वाहन मागेपुढे करताना भिंतीला धक्का लागला. दरम्यान, भिंतीचा वरील भाग चार जणांच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेत १२ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर २२ वर्षीय युवकासह अन्य दोन बालके जखमी झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेल्या युवकाने कोसळणाऱ्या भिंतीचा काही भाग तोलून धरल्याने दोन बालकांना किरकोळ जखमा झाल्या, मात्र स्वत: युवक जखमी झाला आहे.
वाडी येथे दरवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्यासाठी त्यात डीजेचे वाहन मागेपुढे घेत असताना, वाहनाचा धक्का भिंतीला लागला. त्यामुळे भिंतीचा एक वरील भाग अचानक कोसळल्याने हर्षल गोकुळ पाटील (खंबाट) (वय १२) या बालकाच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप प्रकाश तळेकर (वय २२), रोहित विनोद गव्हांडे (वय १२) आणि साही रामेश्वर शिंदे (वय १०) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर पाचोरा येथे उपचार सुरू आहेत. या घटनेत प्रदीप प्रकाश तळेकर हा युवकही मिरवणुकीत होता. भिंतीचा भाग कोसळत असताना प्रदीपने जिवाची पर्वा न करता, तो मानेवर व खांद्यावर तोलून धरला. त्यामुळे रोहित व साही शिंदे या बालकांना किरकोळ जखमा झाल्या.