⁠ 
शनिवार, मे 18, 2024

गटविकास अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप, मात्र बिडीओंचा इन्कार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील खर्ची खु, येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते किशोर पाटील, खर्ची (खुर्द) च्या महीला सरपंचांचे पती दिलीप मराठे व विकास पाटील हे एरंडोल पंचायत समिती खर्ची-खु, येथील घरकुल घोटाळ्याचा चौकशी अहवाल मागण्यासाठी गेले असता गटविकास अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी किशोर पाटील यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, बी. एस.अकलाडे यांनी आपल्यावरील आरोप खोटा, निराधार व विपर्यस्त असल्याचा खुलासा केला आहे. ही घटना १७ फेब्रुवारी २०२२ रोजी ३:३० वाजेता घडली.

किशोर पाटील यांनी १६ फेब्रुवारी रोजी बी.एस.अकलाडे यांच्या कार्यशैलीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरीषद, जळगाव यांच्याकडे तक्रार केल्यामुळे त्याचा राग येऊन बि.डी.ओ यांनी मला शिवीगाळ केली असे किशोर पाटील यांचे म्हणणे आहे. किशोर पाटील हे बि.डी.ओ. यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी एरंडोल पोलिस स्टेशनला जात असताना पंचायत समिती’च्या काही अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली.

दरम्यान, बि.डी.ओ. अकलाडे यांनी या घटनेबद्दल दिलगीरी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. एरंडोल पंचायत समिती कार्यालयात ही घटना घडली तेव्हा काही तळीरामांनी हुल्लडबाजी केली. या प्रकारामुळे नेमके काय घडले याबाबत पं स. कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पंतप्रधान आवास योजनेच्या क्रमानुसार घरकुल याद्या खर्ची खु, ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्या असुन त्यात १०७ लाभार्थ्यांची नावे आली आहेत.

काही नावे गहाळ झाली आहेत.

कोट-१७ फेब्रुवारी २०२२ रोजी खर्ची खु, येथील किशोर पाटील व दिलीप मराठे यांनी पंचायत समिती कार्यालयात येऊन घरकुल यादीतील नावे कशी वगळण्यात आली..? यासाठी माहीती घेण्यास आले. सदर नावे ऑनलाईन निकषांनुसार काढली गेलेली आहेत व सदर लाभार्थी जर पात्र असतील तर त्यांची पुनर्चौकशी करून समाविष्ट करण्याबाबत अहवाल पाठविण्यात येईल अशी माहीती खर्ची खु, च्या ग्रामस्थांना देण्यात आली आहे. या तक्रारींचे उत्तर देण्यासाठी मीच त्यांना कार्यालयात बोलावले होते. यावेळी जमलेल्या काही इसमांनी अरेरावी व हुल्लडबाजी केली.मी कोणालाही शिवीगाळ केलेली नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे व निखालस खोटे असल्याचे गटविकास अधिकारी बि.एस.अकलाडे यांनी सांगितले.