जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । माथेफिरू केव्हा काय करेल हे सांगता येत नाही. शुक्रवारी असाच एक हास्यास्पद आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. शाहूनगर परिसरात एका कार्यालयात काम करणाऱ्या २८ वर्षीय तरुणीच्या कार्यालयात प्रवेश करीत चक्क तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याचा प्रयत्न माथेफिरूने केला. इतकंच नव्हे तर त्याला रोखल्याने त्याने कार्यालयातील वस्तूंची देखील तोडफोड केली. नागरिकांनी त्याला शहर पोलीस ठाण्यात आणले असून तक्रार नोंदविण्यात येत आहे.
गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगर रस्त्यावर असलेल्या एका मोबाईल कंपनीच्या कार्यालयात काही तरुण-तरुणी काम करतात. एका तरुणीच्या मागावर एक तरुण गेल्या काही महिन्यांपासून फिरत आहे. तरुणीने त्यास वारंवार समजविल्यानंतर देखील तरुण ऐकत नसल्याने तरुणीने याबाबत पोलिसात देखील कळविले होते. गेल्या काही दिवसापासून तरुणी कौटुंबिक कारणास्तव सुट्टीवर असल्याने कामावर येत नाही.
शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास माथेफिरू तरुण थेट कार्यालयात शिरला. दिव्या (नाव बदललेले) आहे का? अशी विचारणा करीत दुसऱ्याच एका तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधू लागला. तरुणीने आरडाओरड करताच इतरांनी त्यास बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला विरोध होत असल्याचे पाहून माथेफिरू तरुणाने कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करीत काढता पाया घेतला.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत शहर पोलिसांना कळविले. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माथेफिरू तरुणाचा परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला. तरुणाला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?