जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२१ । धुळे तालुक्यातील नेर येथे नातेवाइकांकडे साखरपुड्याला जात असताना सुरत-नागपूर महामार्गावरील कुसुंबा बायपासवर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बोदर्डे ग्रामसेवक असलेले ईश्वर पंढरीनाथ पवार (रा. पढावद ता. शिंदखेडा) व ग्रामपंचायत शिपाई संजय हिरामण भिल (वय ३५)ठार झाले. या घटनेने बोदर्डे व पढावद या दोन्ही गावात शोककळा पसरली व चूलही पेटली नाही.
ईश्वर पवार यांच्यावर सायंकाळी पढावद तर संजय भिल यांच्यावर बोदर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ईश्वर पवार हे सेना दलातून निवृत्तीनंतर ग्रामसेवक झाले. मनमिळावू स्वभावामुळे सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी ,मुलगा भाऊ असा परिवार आहे. तर संजय हा हिरामण भिल यांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या पश्चात्य आई, वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
एक मुलगा सैन्यात तर दुसरा मुख्याधिकारी
पढावद येथील शेतकरी कुटुंबातील आई-वडिलांनी शेतीत काबाडकष्ट करून पंढरीनाथ पवार यांनी मोठा मुलगा ईश्वर पवार यांना सैन्यात देशसेवेसाठी भरती केले तर दुसरा लहान मुलगा जनार्दन पवार यांना उच्च शिक्षित करून मुख्याधिकारी बनवले. सध्या ते धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
हे देखील वाचा :