जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे गिरणा नदीपात्रात वाळू उपशाला विरोध केल्याने वाळूमाफियांनी एका शेतकऱ्याला जबर मारहाण केल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. मारहाणीत शेतकरी बेशुद्ध झाल्याने वाळूमाफियांनी नदीपात्रातच दोन ट्रॅक्टर सोडून पोबारा केला आहे.
आव्हाणे येथील शेतकरी मनोहर चौधरी यांचे गिरणा नदी पात्रालगत शेत आहे. वाळूमाफिया नदीपात्रातून वाळू उत्खनन केल्यानंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर तसेच डंपर त्यांच्या शेतातून नेत होते. शेतात रस्ता तयार होत असल्याने मनोहर चौधरी यांनी वाळू माफियांना विरोध केला असता वाद झाला. त्यात वाळूमाफियांनी चौधरी यांना जबर मारहाण केली. मारहाणीत चौधरी हे बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.
आव्हाणेतील काही ग्रामस्थ देखील घटनास्थळी आले. त्यामुळे वाळूमाफियांनी गिरणा नदीपात्रात दोन ट्रॅक्टर सोडून पोबारा केला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी नदीपात्रात दाखल झाले. गेल्या काही महिन्यात वाळूमाफियांचे आपसातील वाद आणि मुजोरी वाढतच असून प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
- धक्कादायक ! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल