जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । जमीन मोजणीच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि भूमिअभिलेख कार्यालयातील तोकडे मनुष्यबळ या बाबींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन १२ आधुनिक जमीन मोजणी यंत्रे भूमिअभिलेख कार्यालयास मिळणार आहेत. यासाठी १ कोटी २० लाख ६१ हजार ३० रुपयांची तरतूद केली आहे. यातून रोव्हर मशीन युनिट प्रणाली यांचा समावेश असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
यंत्रांमुळे जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने होणार आहे. उर्वरित ईटीएस मशीन आणि प्लॉटरसाठी ७० लाखांची तरतूदही पुढील काळात करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. भूमिअभिलेख कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व जमिनींच्या अभिलेख्यांचे जतन करण्यासह नागरिकांच्या मागणीसह त्यांच्या जमिनींचे मापन करण्यात येते. यात हद्दी निश्चित केल्यानंतर बिनशेती, ले-आऊट, भूसंपादन, भूप्रदान आदी प्रक्रियांच्या मदतीने अभिलेख तयार केले जातात. आजवर या सर्व प्रक्रिया प्लेन टेबल या पारंपरिक पद्धतीत पार पाडल्या जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तर लागतेच पण अनेक ठिकाणी झाडी-झुडपी, डोंगरदऱ्या यामुळे जमीन मोजणीत मोठ्या अडचणी येतात. या अनुषंगाने जिल्हा भूमिअभिलेख विभागाला जमीन मोजणीसाठी अद्ययावत उपकरणे मिळावीत, अशी मागणी संबंधित खात्यातर्फे करण्यात आली हाेती.
विभागाचे आधुनिकीकरण : प्रत्येक तालुक्याला एक असे १५ भूमिअभिलेख कार्यालये आणि एक नगर भूमापन असे १६ कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी या निधीचा उपयोग होईल. अंतर्गत जीआयएस प्रणालीचा वापर करून रोव्हर मशीनच्या मदतीने भूमिअभिलेख कार्यालयाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक असणारे जिल्ह्यात चार कॉर्स स्टेशन्स असून, ते अनुक्रमे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, फत्तेपूर ता. जामनेर, सार्वजनिक बांधकाम खाते कार्यालय अमळनेर आणि सार्वजनिक बांधकाम खाते कार्यालय भडगाव येथे स्थापित करण्यात आलेली आहे. याच्याशी कनेक्ट असणाऱ्या १२ रोवर मशिन्स या निधीतून खरेदी होतील.
हे देखील वाचा :
- रेशन कार्डांबाबत मोठी अपडेट; वाचा अन्यथा रद्द होवू शकते तुमचे रेशनकार्ड
- शरद पवार, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पाचोऱ्यात प्रतिउत्तर देणार का ?
- धक्कादायक : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे यावल तालुक्यात महिलेचा मृत्यू
- सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली? ; आमदारांनी फोनवर एकविले डिलिंग
- एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा 26 ऑगस्टला पाचोऱ्यात