जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । जिल्ह्यात अवैध धंदे विरोधात गेल्या चार दिवसापासून जोरदार कारवाई सुरु असून शुक्रवारी सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील खिरोदा येथील बस स्टॅन्ड परिसरात १ गावठी कट्टा व १ जिवंत काडतुससह दोघांना पकडण्यात आले. पोलीस महानिरीक्षकांचे विशेष पथक आणि सावदा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. दोघांना ताब्यात घेऊन सावदा पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे.
गुरुवारी एलसीबीच्या पथकाने ५ गावठी पिस्तूल आणि ७ जिवंत काडतूससह चौघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच जळगाव लाईव्हच्या बातमीनंतर अवैध धंदे, सट्टा, पत्ता, गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. गेल्या चार दिवसापासून पोलीस प्रशासनाची दमदार कामगिरी सुरु आहे. शुक्रवारी सावदा येथे देखील दोघांना १ गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली. गजानन भिकन शेजोळे रा.अंजनखोरे जि.औरंगाबाद, अनिल बद्री कछुआ रा.कुऱ्हे पानाचे ता.भुसावळ अशी आज ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
शुक्रवारी दुपारी १ वाजेदरम्यान नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या पथकातील बशीर तडवी, हवालदार राजेंद्र बोरसे, मनोज दुसाने, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले, उपनिरीक्षक राजेंद्र पवार व समाधान गायकवाड, हवालदार मनोज हिरोळे, संजय चौधरी, ममता तडवी, यशवंत टहाकळे आदींनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडून १ गावठी कट्टा आणि १ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सावदा पोलीस स्टेशनला सुरू आहे.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना