जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पहाटेच्या शपथविधीबाबत वक्तव्य केलं आहे.
महाजन म्हणाले की, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं आहे. ते वास्तव आहे. शरद पवार यांनी मोठ्या मनाने मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांचे आभार आहे. जगाने मान्य केलं आहे की, नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत. पण युती करण्यासंदर्भात पवारांना विचारले होते परंतु त्यांनी नाही सांगितले होते. पण शरद पवार यांनी अर्धसत्य सांगितले आहे. त्यांनी पूर्ण सत्य सांगायला पाहिजे होते असे गिरीश महाजन म्हणाले.
भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत सर्व चर्चा झाली होती, दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि शरद पवार यांच्या बैठका झाल्या, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत. एवढेच नाही तर या बैठकीत कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं हेही ठरलं होतं, पण जेव्हा काँग्रेस शिवसेनेसोबत यायला तयार झाली तेव्हा शरद पवारांनी आपला शब्द फिरवला, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. दरम्यान, भाजपच्या आरोपांना शरद पवार काय उत्तर देणार? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.