जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अंगठे घेऊन मोफत धान्य वाटप न करता ऑनलाइन पावत्या काढणारे जळगाव तालुक्यातील १४० रेशन दुकानदार दोषी आढळून आले.याबाबतचा अहवाल तहसीलदार नामदेव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सादर केला असून १०० पेक्षा जास्त पावत्या काढणाऱ्या रेशन दुकानांचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. यामुळे रेशन दुकानदारांच्या गोत्यात खळबळ उडाली आहे.
तहसीलदार नामदेव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील १४० रेशन दुकानदारांची तपासणी केली होती. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेला आहे. रेशन दुकानदारांवरील दोष गंभीर स्वरूपाचे आहेत. सर्व रेशन दुकानदारांनी धान्यवाटपात अत्यंत बेजबाबदारपणा, कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा केलेला असल्याचे दिसून आले. ऑनलाइन धान्यवाटप व शिल्लक धान्य साठ्यात तफावत आढळून आली. सुनावणीवेळी रेशन दुकानदारांनी सादर केलेला खुलासा हा वैचारिकरीत्या एकत्र येऊन त्यांच्या सोयीनुसार सादर केला असल्याचे आढळून आले. त्यांच्या खुलाशास कोणताही कायदेशीर आधार नसल्याने तो ग्राह्य धरण्यात आला नाही. आकारण्यात आलेल्या दंड व जप्त अनामत रक्कमेचा आकडा सुमारे ८ लाखांवर जातो.
प्रत्यक्षात धान्याचे वाटप लाभार्थ्यांना झालेले नसल्याने ते शासकीय गोदामातच शिल्लक आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनी पावत्यांवरील दर्शवलेल्या धान्याचे नियतनही जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. त्या १४० रेशन दुकानदारांसाठी गोदामात ८ हजार क्विंटल धान्याचे नियतन आहे. त्याची किंमत १ कोटी २० लाख एवढी आहे. लाभार्थ्यांचे अंगठे घेऊन ऑनलाइन पावत्या काढल्याचा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने १ कोटीवर धान्याचा अपहाराला आळा बसला आहे.
रेशन दुकानदारांवरील दंडाचे स्वरूप
१ ते १०१ पावत्या काढणाऱ्या रेशन दुकानदारांना प्रत्येकी २ हजार रुपये दंड. १०१ ते २५० पावत्या काढणाऱ्या रेशन दुकानदारांना प्रत्येकी ५ हजार दंड. २५१ व त्यापुढील पावत्या काढणाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड. सर्व रेशन दुकानांची अनामत रक्कम जप्त, शहरी भागासाठी ३ हजार तर ग्रामीण भागासाठी १ हजार रुपये.
धान्य न देता अशा काढल्या पावत्या
१ ते १० पावत्या ६० रेशन दुकान, १० ते २० पावत्या ११ रेशन दुकान, २० ते ३० पावत्या १० रेशन दुकान, ३० ते ४० पावत्या ८ रेशन दुकान, ४० ते ५० पावत्या २ रेशन दुकान, ५० ते १०० पावत्या १२ रेशन दुकान, १०० ते २०० पावत्या २२ रेशन दुकान, २०० ते ३०० पावत्या ८ रेशन दुकान, ३०० ते ४०० पावत्या ४ रेशन दुकान व ४०० ते ५०० पावत्या ३ रेशन दुकान.
हे देखील वाचा
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?