⁠ 
रविवार, नोव्हेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | नेत्यांची जुगलबंदी, जळगावकरांचे हाल

नेत्यांची जुगलबंदी, जळगावकरांचे हाल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या तीन दिवसांपासून दिग्गज नेत्यांची जुगलबंदी पाहावयास मिळत आहे. कुणाला हेमामालिनीचे गाल दिसताय तर कुणाला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत फिरणारा नेता, कुणी कुणाचा बाप काढतोय.. अरे या जळगाव जिल्ह्यात चाललंय तरी काय? केवळ बोदवडच्या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधींना वेळ आहे मात्र ज्या जळगाव शहरवासीयांनी यांच्यावर विश्वास ठेवत आजवर मतदान केले ते गेल्या तीन वर्षांपासून नरकयातना भोगताय तरीही यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असेल? असा प्रश्न उपस्थित होतो. जळगावकरांचे दररोज होणारे हाल पाहण्यास नेत्यांना वेळ नाही मात्र जुगलबंदी रंगविण्यात जास्त रस आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची सभा समोरासमोर होती. दोन्ही नेत्यांच्या सभेचे आवाज एकमेकांपर्यंत पोहचत होते. आ.गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार टीका केली. ‘मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतात, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास. म्हणे मोठा नेता! १५ वर्षे लाल दिव्याची गाडी अन् १२ खाती मिळाली, पण यांना मतदारसंघाचा विकास करता आला नाही, असं महाजन यांनी खडसेंना सुनावलं. ‘चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला शिक्षा दिलीय. तुम्ही आता कितीही आवाज चढवलात, तरी तुमची धार बोथट झाली आहे. आता तुमचं खरं नाही. दुकानदारी बंद करा. तुमच्या ग्रामपंचायतीतही तुमचा माणूस नाही. नगरपालिकेत तुमचा माणूस नाही आणि बोदवडमध्ये यांचा माणूस निवडून आणण्याची स्वप्न पाहत आहेत. कितीही वल्गना केल्या तरी आता उपयोग नाही. जनतेची सेवा करावी लागते. सेवा केली नाही म्हणून जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली. तुमच्या मुक्ताईनगरमध्ये आमचा माणूस आमदार आहे, असं म्हणत, चंद्रकांत पाटील यांना आम्हीच निवडून दिल्याची कबुलीच महाजनांनी दिली. शेरोशायरी करून कुणी सव्वाशेर होत नाही. आता तुमचा दबदबा राहिलेला नाही. तुम्ही सव्वाशेर नाही, आता पावशेर झालात, असा टोलाही महाजन यांनी हाणला.

माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी देखील सडेतोड उत्तर देत, ‘भाजपमध्ये असताना राज्यात व केंद्रात सत्ता असताना जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी विकासकामे केली. कामे केली म्हणूनच बोलतो. यात मी पणा नाही. करून दाखवलं एवढंच सांगायचंय. तुम्ही कितीही म्हटलं नाथाभाऊ गेला, नाथाभाऊ दवाखान्यात गेला, नाथाभाऊ आता परत येत नाही, पण लक्षात ठेवा नाथाभाऊ तुमचा बाप आहे, असा इशारा खडसेंनी दिला. ‘काही लोकांनी घरात राहून गद्दारी केली. इतरांचे काने भरले. मात्र जनता जनार्दनाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. सत्तापालट झाला, असं खडसे म्हणाले.

माजी आ.एकनाथराव खडसे, आ.गिरीश महाजन यांची जुगलबंदी कमी होती कि काय त्यात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी देखील उडी घेतली. आपल्या शेरोशायरीच्या स्टाईलमध्ये त्यांनी खडसेंवर शिरसंधान साधले. ना.पाटील म्हणाले की, ‘गेले तीस वर्ष जो पिक्चर तुम्ही पाहिला तरी तुम्ही बोर होत नाही, आता मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हा सरळ चालणारा हिरो आहे. तेव्हा आता शिवसेनेचा पाच वर्षांचा पिक्चर पाहा. आमचे कोणतीही बाप, दादा ग्रामपंचायतीचा मेंबर नव्हता आणि आम्ही धोकेबाज किंवा गद्दार पण नाही’ असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता खडसेंना चिमटा काढला.

बोदवड नगरपंचायतीच्या निमित्ताने जळगावकर नागरिक नेत्यांच्या जुगलबंदीचा आनंद घेत आहेत पण जळगाव शहरवासी मात्र निराश आहेत. जळगाव शहरवासियांना गेल्या निवडणुकीच्या वेळी अशीच गाजरे नेत्यांनी दाखवली होती. जळगाव मनपात सत्ता तर आली परंतु जळगाव शहराचा विकास मात्र हवेत विरला. जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर महत्वाचे स्थान आहे. जळगाव शहराच्या राजकारणात जळगावकरांनी आजवर सुरेशदादा जैन, एकनाथराव खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गुलाबराव देवकर यांच्यावरच विश्वास ठेवला. अनेक खासदार बदलले त्यात भाजपचं नेहमी वरचढ आहे. गेल्या काही वर्षातील चित्र लक्षात घेता जळगाव लोकसभा मतदार संघातून ए.टी.नाना पाटील, उन्मेष पाटील यांनी तर विधान परिषदेवर डॉ.गुरुमुख जगवानी, चंदूभाई पटेल यांनी आपले कार्य केले. जळगाव शहरात यापैकी कुणीही मनापासून लक्ष दिले नाही असेच म्हणावे लागेल.

जळगाव शहराच्या तुलनेत धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगरचा विकास झपाट्याने झाला असून आजही सुरूच आहे. अनेक जळगावकर शहर सोडून इतरत्र स्थायिक होत आहेत. जळगावात रहावे का? असा प्रश्न आज उपस्थित होतो. जळगाव शहरातील रस्ते चालण्यालायक राहिले नाहीत, पथदिव्यांचे काम अद्याप रखडले आहे, अमृत योजना, भूमिगत गटारी वेळेत पूर्ण होत नाही, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प वाऱ्यावरच आहे, कचऱ्याचे ढीग जागोजागी साचलेले आहेत, महामार्ग, उड्डाणपुलांचे कार्य रखडलेलेच आहे. नेत्यांना बोदवडच्या नगरपंचायत निवडणुकीसाठी जुगलबंदी करायला, जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकत्र यायला वेळ आहे मात्र जळगावकरांना ते भोगत असलेल्या नरकयातनेतून त्यांची सुटका करण्यास वेळ नाही. जळगावकर विकास आणि सोयसुविधांच्या बाबतीत कायमच कमनशिबी ठरले आहे. जळगाव शहराचा विकास झाला तर नेत्यांची देखील मान उंचावेल हे ठाऊक असताना देखील ते लक्ष देत नाही. सर्वच नेते स्वतःची पोळी शेकून घेण्यात व्यस्त असून कायम चर्चेत राहण्यासाठी केलेली धडपड आहे. जळगाव शहरवासियांच्या विकासासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे अन्यथा जळगावकरांना जळगाव सोडून जाण्यावाचून पर्याय राहणार नाही.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.