जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । जळगाव शहरातील फळ गल्ली परिसरात लॉकडाऊनचे चित्रीकरण करणाऱ्या न्यूज पोर्टलच्या पत्रकाराचा मोबाईल आणि कॅमेरा घेऊन दुचाकीस्वार तिघांनी पळ काढल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कंजरवाडा समोर मुख्य रस्त्यावर देखील एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावून दुचाकीस्वारांनी पळ काढल्याची घटना घडली.
शेरा चौकातील रहिवासी अल्ताफ इस्माईल शेख वय-३० वर्षे हे क्राईम नोट या साप्ताहीक वृत्तपत्र व युटुबच्या न्यूज चॅनेलला रिपोर्टर म्हणुन काम करतात. दि.२९ रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास ते पत्रकार तन्वीर पिंजारी यांच्यासह साने गुरुजी चौकातील फळ गल्लीत लॉकडाऊन बाबतचा आढाव्याचे मोबाईलने चित्रीकरण करीत होते.
मोबाईलला सपोर्ट म्हणुन त्यांनी तन्वीर पिंजारी यांचा फोटो काढण्याचा कॅमेरा डाव्या हातात पकडलेला होता. काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तिघांनी अल्ताफच्या हातातील मोबाईल आणि कॅमेरा हिसकावून टॉवर चौकाकडे पळ काढला. दोघांनी धावत जात दुचाकीचा पाठलाग केला परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. दुचाकींचा क्रमांक ३३१२ इतकाच दिसला असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक भिमराव नांदूरकर करीत आहे.