जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । अमळनेरात भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख ६५ हजार रुपयांचे तसेच १३ तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना १६ रोजी दुपारी घडली.या प्रकरणी ज्ञानेश्वर वारुळे यांच्या फिर्यादिवरून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
घटने प्ररकणी जळगाव येथील श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.परंतू, ठोस सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही.अमळनेर शहरातील केशव नगरातील ज्ञानेश्वर वसंत वारुळे हे पत्नी व मुलीसोबत धुळे रोडवरील दवाखान्यात गेले होते. त्यांचे बंद घर हेरून चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील २ लाख २८ हजार रुपयांचे ५७.३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, २ लाख रुपये किमतीचा ५०.२० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ, ९२ हजार रुपये किमतीच्या २३.१५० ग्रॅम वजनाच्या दोन सोनसाखळ्या, २० हजार रुपयांची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १२ हजाराचे ३ ग्रॅमचे कानातले, १३ हजार रुपये किमतीचे ९ भार चांदीचे ब्रेसलेट, ७ भार चांदीची साखळी असे एकूण ५ लाख ६५ हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवले.या ठिकाणी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, अनिल भुसारे, शत्रुघ्न पाटील, सुनील हटकर, रवी पाटील, दीपक माळी यांनी भेट दिली. ज्ञानेश्वर वारुळे यांच्या फिर्यदिवरून घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.