जळगाव महापालिकेने घेतलेला ‘तो’ निर्णय अखेर २४ तासात घेतला मागे
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । ‘ओमायक्राॅन’ या काेराेनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर प्रशासन हादरलं आहे. काेराेनापासून बचावासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याने प्रशासनाकडून भर दिला जाताे आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेने लसीकरण न केलेल्या वाहनधारकांना पेट्रोल न देण्याचे काढले होते; परंतु हा आदेश २४ तासात मागे घेतला आहे. पेट्राेल ही अत्यावश्यक बाब असून त्याला नकार देता येणार नसल्याने मनपाने आपल्या आदेशात बदल केला आहे. आता इंधन भरण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना लसीकरण केल्याबाबत विचारणा केली जाणार असून गर्दीच्या ठिकाणी केंद्र सुरू केले जाणार आहेत.
ओमायक्राॅनचा धोका वाढू नये यासाठी प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. जळगाव शहरात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचे दाेन डाेस घेणाऱ्यांची संख्या केवळ ५० टक्के आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त शाम गाेसावी यांनी गुरूवारी शहरातील पेट्राेलपंप व्यावसायिक व व्यापारी असाेसिएशन अध्यक्षांना नाेटीस बजावली हाेती. त्यात केवळ काेविड १९ लसीकरण प्रमाणपत्र असणाऱ्या नागरीकांना पेट्राेल भरणा करून द्यावा असे आदेश काढले हाेते.
मात्र या निर्णयाचे वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटू लागल्या होत्या. या आदेशानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत व आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासाेबत चर्चा झाली. पेट्राेल ही अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे लसीकरण नाही म्हणून पेट्राेल देणे नाकारता येणार नाही. याबाबत सक्ती करता येणार नाही. राज्यातील अन्य शहरातील स्थिती लक्षात घेता आदेशात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनपाने बजावलेल्या नाेटीस शुक्रवारी पेट्राेलपंप व्यावसायिकांना मिळाल्या हाेत्या. त्यानंतर काही तासात पालिकेने आदेश मागे घेतल्याने पंप चालकांसमाेर निर्माण झालेला माेठा पेच सुटला आहे. यासंदर्भातील सुधारीत आदेश शनिवारी काढला जाणार आहे.