जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । शहरातील नाथवाडा येथील रहिवासी राजेंद्र जोशी हे नूतन मराठा संस्थेत शिपाई पदावर आहेत.सन २०१९ मध्ये त्यांची हातेड येथे बदली झाली होती. जोशी त्या ठिकाणी रुजू होऊनही त्यांना दोन वर्षांपासून पगार मिळाला नाही. त्यामुळे याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.अखेर त्यांच्या वडिलांनी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेतली असता तातडीने याबाबत कार्यवाहीचे आदेश त्यांनी दिले.दोनही शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र देण्यात येणार असून, दोन वर्षांनी जोशी यांना न्याय मिळणार आहे.
सविस्तर असे की, राजेंद्र वामन जोशी यांची २०१९ मध्ये हातेड (ता.चोपडा) येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात बदली झाली. बदली झाल्याने जोशी रुजूही झाले. परंतु, २०१९ पासून आजपर्यंत पगारच मुख्याध्यापकाने काढलेला नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे त्यांनी वारंवार तक्रारी केल्या.परंतु,दोन वर्षांपासून केलेल्या तक्रारींची दखल माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेतली जात नव्हती. अशात जोशी यांना कॅन्सरने ग्रासले. त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. दरम्यान, शिक्षण उपसंचालक उपासनी हे
नियमित तपासणीसाठी जळगावात आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी राजेंद्र जोशी यांच्या वडिलांना घेऊन त्यांच्यासमोर कैफियत मांडली. यावेळी शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकरणात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधितास पगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासह उपशिक्षक नरेंद्र साहेबराव पाटील यांचाही अर्ज प्रलंबित होता. त्यांनीही भेट घेतली असता, अर्जावर कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालकांनी दिले आहे.