जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । शहरातील मेहरूण परिसरातील मंगलपुरीत सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या आसाराम पवार यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रमुख न्या.एस.डी.जगमलानी यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कल्लूसिंग राजपूत असे आरोपीचे नाव आहे.
मेहरुण परिसरातील मंगलपुरी भागात दि.६ फेब्रुवारी २०११ रोजी सुरेश बंजारा यांचे काही लोकाशी भांडण सुरु असताना आसाराम छोटेलाल पवार, वय ३० वर्षे मुळ रा. कुंडीया, ता. हरसूद, जि. खंडवा, म. प्र. हा भांडण सोडवा सोडव करु लागला असता, सुरेश बंजारा यांचा जावई आरोपी कल्लुसिंग शंकरसिंग राजपुत, वय २५ वर्षे, ग. शांती नारायण नगर, मेहरुण, जळगांव मुळ रा. तेसाही, ता. खागा, जि. फतेहपुर, उ.प्र. याने त्याच्या हातातील चाकु मयत आसाराम याचे डावे हातातील बगले खाली मारुन त्याला गंभीर दुखापत केली व आरोपी तेथुन पळून गेला.
आसाराम यास त्याचा भाउ दिनेशराव याने सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले असता उपचार सुरु असतांना आसाराम याने दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गु.र. नंबर ५९/२०११ भादवि कलम ३०७ नुसार आरोपी कल्लुसिंग, वय २५ वर्षे व त्याचा भाउ जितेंद्रसिंग, वय २२ वर्षे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपींना पोलिसांनी दि.८ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मुळ फिर्यादी आसाराम हा मरण पावल्यामुळे सदर गुन्हयाच्या कामी भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे कलम वाढविण्यात आले. तपास अधिकारी बी.ए. कदम, पोलीस उपनिरीक्षक, एमआयडीसी पो.स्टे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.
सदरचा खटल्याची जळगांव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यात सरकारपक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये मयताचे पत्नी व भाउ तसेच आरोपीचे सासु, सासरे तसेच मृत्युपूर्व जबाब नोंदविणारे कार्यकारी दंडाधिकारी पुरुषोत्तम खैरनार, डॉ. किरण पाटील, डॉ. उमेश वानखेडे, तसेच तपास अधिकारी बी.ए. कदम यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. मे. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने आरोपी कल्लूसिंग यास भा.दं.वि. कलम ३०२ खाली जन्मठेप व रुपये ५ हजार दंड व दंड न भरल्यास ३ महीने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी जितेंद्रसिंग यास न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले आहे. याकामी सरकार पक्षातर्फे अति शासकीय अभियोक्ता प्रदीप एम.महाजन यांनी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला व सरकार पक्षातर्फे काम पाहिले आहे. याकामी पैरवी अधिकारी राजेंद्र सैदाणे यांनी मोलाची मदत केली.