जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ । महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांच्यासोबत आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल शनिवारी अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांनी जिल्हाअधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन निषेध व्यक्त करीत कठोर व तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
सदर घटनेचा तपास दहा दिवसात पूर्ण करण्यात यावा; अकराव्या दिवशी कोर्टात चार्जशीट दाखल करावे व सदर प्रकरण विशेष न्यायालयात चालून ९० दिवसाच्या आत या प्रकरणाचा अंतिम निकाल लावण्यात यावा जेणेकरून भविष्यात लोकप्रतिनिधी अथवा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती अशाप्रकारचे गैर कृत्य करणार नाही यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमाने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यपाल भगतसिंग कोशायरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, ऊर्जा मंत्री नितीन राऊत,पोलिस अधिक्षक जळगाव व राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी संघटना मुंबईला ईमेल द्वारे करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक अधिकारी- कर्मचारी संघाचे जळगाव चे अध्यक्ष माजी उपायुक्त (जीएसटी )एन .ए .तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मानियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाअध्यक्ष मजहर पठाण, अल्पसंख्यांक सेवा संघाचे अध्यक्ष सलीम इनामदार, हुसेनी सेना चे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख , सालार नगर चे सैयद दानिश, शिकलगर बिरादरीचे अनवर खान,शरीफ शाह बापू फाऊंडेशनचे अध्यक्ष आसिफ शाह, तांबापूर संघटनेचे नदीम शेख नबी व एजाज अहेमद शेख यांची उपस्थिती होती तर नीवेदनावर अक्सा बॉईज फाउंडेशनचे अध्यक्ष एडवोकेट आमीर शेख, शिवसेनेचे महानगर अध्यक्ष झाकीर पठाण,एम पी जे चे अध्यक्ष आरिफ देशमुख, मार्क्सवादी पक्षाचे अकिल पठाण व अपनी गल्लीचे अध्यक्ष अताअल्लाह खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.