वाळू उपसासाठी जिल्ह्यात २९ गावांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१। जिल्हा प्रशासनाला सध्या २९ गावांनी त्यांच्या हद्दीतील वाळू उपसा करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असून, त्यासाठी उत्खनन करण्याचे ठराव जिल्हा खनिकर्म विभागाला दिले आहेत. यात तापी, गिरणा काठच्या गावांसोबत सुकी नदीतील काही ठिकाणच्या वाळू गटांचा समावेश आहे. त्यातील १२ गावांच्या हद्दीतील वाळू गटांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर १७ गटांची लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे.
या गावांचा समावेश
यात वडगाव, आंदलवाडी, निंभोरे बु., केन्हाळे बु. धुरखेडा, पातोंडी, धोडे बलवाडी, ता. रावेर, बाभूळगाव, ता. धरणगाव, भोकर, पळसोद, ता जळगाव, पिंप्री नांदू पातोंडी ता. मुक्ताईनगर, सावखेडा, धावडे, तांदील ता. अमळनेर या गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यातून होणारा वाळू उपसा हा गिरणा आणि तापी नदीतून केला जातो. सध्या जिल्ह्यात एकाही वाळू गटाचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे सुरू असलेला वाळू उपसा हा बेकायदेशीररीत्या होत आहे. त्यात जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी २९ ठिकाणच्या वाळू गटांसाठी जिल्हा प्रशासनाला सकारात्मकता दर्शवली आहे.