पन्नाशीनंतरचा काळ वृद्धत्वाचा नसून सुवर्णकाळ : नितीन अनंत
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । जेष्ठ नागरिकांना नवीन तंत्रज्ञान समजून त्याचा पुरेपूर उपयोग करणे शिकावे लागेल. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण मान्य करून ते फेडण्याची इच्छा ठेवावी. जेव्हा समविचारी मंडळी एकाच ध्येयाने भारीत होतात आणि एकत्र येतात, तेव्हा सुवर्णयुग येते. पन्नाशीनंतरचा काळ वृद्धत्वाचा नसून तो सुवर्णकाळ आहे, हे जर मान्य केले व कृती कार्यक्रम राबविला तर जेष्ठ नागरिक सुवर्णयुग आणू शकतात, असे प्रतिपादन साहित्यिक, उद्योजक तथा चित्रपट समीक्षक नितीन अनंत यांनी केले.
आनंदाश्रम सेवा संस्थातर्फे ‘पन्नाशीनंतर-आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन रविवार दि.२८ रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यनारायण खटोड उपस्थित होते. सुरुवातीला प्रस्तावनेतून आनंदाश्रम संस्थेविषयी अध्यक्ष सत्यनारायण खटोड यांनी माहिती देत, संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना नितीन अनंत म्हणाले की, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम असे चार आश्रम हिंदू संस्कृतीमध्ये सांगितले आहे. पन्नाशीनंतरचा काळ हा सुवर्णकाळ म्हणून आपल्याला जगायचं आहे. जगण्यातला आनंद भरपूर घ्यायचा आहे. जगण्यातला अर्थ पूर्ण होईल असे जगायचे आहे. म्हातारपण हा शब्दच नाही. शरीर कधीच थकत नाही, या शब्दावर विश्वास ठेवा. पन्नाशीनंतर हळूहळू अंगावरील जबाबदाऱ्या कमी करा. मात्र यामुळे तुमच्यातील उपयोगिता संपली असे समजू नका.
शरीर हे आळशीच असते. मी थकलो म्हटले की शरीर कामच करीत नाही. शरीराला मनाने तरुण ठेवा. मनाला वार्धक्य येऊ देऊ नका. तुमच्याकडे पॉझिटिव्ह थिंक्स आहेत. पन्नाशीनंतर आपल्या जबाबदाऱ्या कमी होत जातात. आयुष्यात पन्नाशीनंतर सुवर्णकाळ सुरू होतो. सुवर्णकाळ म्हणजे तुमच्यातली कौशल्य, हुशारी, सुप्त गुण जगाला व तुम्हालाही दिसतात. तुम्ही स्वत अजूनही बरच काही करू शकता ही नवी जाणीव तुम्हाला होते. तुम्ही तुमच्या आसपासचे वातावरण बदलतात. शांतपणे जीवन जगण्याची ही वर्षे म्हणूनच हा जीवनाचा सुवर्णकाळ आहे. नवीन काहीतरी शिकावे लागेल, त्यासाठी तब्येत छान ठेवावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.
पन्नाशीनंतर कसे जगावे यासाठी त्यांनी काही मूलमंत्र दिले. शारीरिक विकासासाठी प्रत्येकाने नीट आहार घ्यावा. शिळे अन्न टाळा. चौरस आहार घ्या. गरजे इतकीच झोप घ्या. रोज नियमाने कमीत कमी अर्धा तास व्यायाम करावा. जर व्यायामात खंड पडला तर मन लाडावते आणि आळशीपणा यायला लागतो. ६ ते ८ तास झोप पुरेशी व योग्य झोप आहे. मजेत जगायला शिकणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री कुलकर्णी यांनी केले तर आभार दिलीप पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमांगीनी सोनवणे, दिनेश कक्कड, दिलीप पवार, नवनीत पटेल, मनोहर पटेल, सुरेश शंखपाळ, सुधा काबरा, धनंजय खडके, शंकर पटेल आदींनी परिश्रम घेतले.