अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : जैन इरिगेशनच्या संघाची रिझर्व बँक संघावर मात
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१। पुडूचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरसंस्था अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रिझर्व बँक ऑफ इंडिया संघावर २-१ असा विजय प्राप्त करून जैन इरिगेशनच्या पुरूष संघाने आपले पहिले राष्ट्रीय सांघिक विजेतेपद प्राप्त केले.
याआधी जैन इरिगेशनच्या पुरूष संघाला तीन वेळा आणि महिला संघाला एकदा विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. यावेळी मात्र जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने जबरदस्त कामगिरी करताना शेवटपर्यंत एकही सामना न गमावता विजेतेपदास गवसणी घातली. जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रिपणकर याने आपले सहा पैकी सहा सामने जिंकून सर्वोत्तम कामगिरी केली. पंकज पवार याने दोन ओपन टू फिनिश केले आणि अंतिम सामन्याच्या निर्णायक लढतील योगेश धोंगडेने शेवटच्या बोर्डावर प्रतीस्पर्धा खेळाडू जहीर पाशाची १० गुणाची आघाडी असताना ११ गुणासह बोर्ड आणि सामना जिंकून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
उपांत्य सामन्यात जैन इरिगेशन संघाने सिव्हिल सर्विसेस संघावर ३-० ने विजय प्राप्त केला. अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रिपणकरने रिझर्व बँकेचा व्ही आकाशला २५-० आणि २५-० असा पराभव करून विजयी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात मात्र जैन इरिगेशनच्या पंकज पवार हा रिझर्व बँकेच्या विश्वविजेता व सध्याच्या राष्ट्रीय विजेता खेळाडू प्रशांत मोरे कडून १२-२२, २०-१९ आणि ११-२५ असा पराभूत झाला. एकेरीच्या तिसऱ्या आणि निर्णायक लढतील योगेश धोंगडेने जहीर पाशा विरुद्ध पहिला सेट २५-१३ जिंकला दुसरा सेट मध्ये योगेश धोंगडेची शेवटच्या बोर्ड पर्यंत आघाडी असतानासुद्धा जहिर पाशाने अंतिम बोर्ड मध्ये ओपन टू फिनिसची नोंद करून दुसरा सेट जिंकून सामन्यात रंगत आणली.
तिसऱ्या व निर्णायक सेट मध्ये योगेश धोंगडे पहिले दोन्ही बोर्ड जिंकून ११ गुणांची आघाडी घेतली परंतु त्यानंतर जहीर पाशाने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत अंतिम बोर्ड बाकी असताना १० गुणांची मोठी आघाडी घेतली होती परंतु योगेश धोंगडेने सामन्याच्या शेवटच्या बोर्डावर स्वतःची सर्विस वर ११ गुण घेत सामना जिंकून संघास ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. जैन इरिगेशनच्या विजेतापद पटकाविल्या बद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, जैन स्पोर्टस अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे यांनी केले.
कॅरम स्पर्धेतील यश अभिमानास्पद
राष्ट्रीय पातळीवरील आंतर संस्था कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनचा पुरुषांचा कॅरम संघ अंतिम विजेता ठरला. ही निश्चितच अभिमानस्पद बाब असून संघातील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन.
– अतुल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक, जैन इरिगेशन