⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

‘आम्ही पक्षी अंधश्रद्धेचे बळी’ निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील निसर्गमित्रतर्फे पक्षी सप्ताहानिमित्त ‘आम्ही पक्षी अंधश्रद्धेचे बळी’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. स्पर्धेत वैजापुर (जिल्हा औरंगाबाद) येथील वनिता दयाटे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला, अशी माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

निसर्गमित्र, जळगावतर्फे पक्षी सप्ताहनिमित्त दि.५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान ‘आम्ही पक्षी अंधश्रद्धेचे बळी’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जळगाव, धुळे, नाशिक, अकोला, वर्धा, नागपुर, बुलढाणा, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, यांसह बडवनी (मध्यप्रदेश) व लंडन येथील स्पर्धकांनी भाग घेतला. एकूण ६१ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. सर्व स्पर्धकांनी आपले निबंध व्हाट्स ऍपवर पाठविले होते. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. स्पर्धेत वनिता चंद्रभान दयाटे,(रा. वैजापूर, जि. औरंगाबाद), यांनी प्रथम, आरती विनोदरव नांदुरकर, (रा. हिंगणघाट, जि. वर्धा), यांनी द्वितीय तर तेजस्विनी पंडितराव जगताप, (रा. पुणे), यांनी तृतीय तर उत्तेजनार्थ मयुरी मकरंद परब,(रा. तुळस, जि.सिंधूदुर्ग), निलेश मधुकर पाटील, (रा. पाचोरा, जि.जळगाव), आयुष अनिल शेलार,(रा. ठाणे), मेघा प्रतापराव बुरंगे, (रा. नागपुर), विद्या अशोक बरदाडे,(रा. पिसवारे, जि.पुणे) यांनी मिळविले. सर्व यशस्वी स्पर्धकांसह अन्य स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

जनजागृतीसाठी स्पर्धेचे आयोजन
निबंध स्पर्धेचा उद्देश सांगताना पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ म्हणाले की, दि.५ नोव्हेंबर रोजी पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि दि.१२ नोव्हेंबर रोजी पद्मभूषण डॉ.सालीम अली यांची जयंती असल्याने या दिवसांचे औचित्य साधून पक्षी सप्ताह साजरा केला जातो. जैवविविधतेतील मोठा घटक असलेल्या पक्ष्यांविषयी समाजात विविध समज गैरसमज व अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. यामुळे पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून अनेक पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. वशीकरण व धनलाभाच्या उद्देशाने घुबडाचा बळी दिला जातो. वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार व सोबतच जादूटोणाविरोधी कायदा २०१३ नुसार असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन व याबाबत जनजागृती व्हावी, या हेतूने ही निबंध स्पर्धा घेण्यात आल्याचे ते म्हणाले.