गणपतीनगरात घरफोडी; ५७ हजाराचा ऐवज लंपास
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । आजीच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी कंडारी येथे गेलेल्या नातवाच्या घरात चोरटयांनी डल्ला मारत ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील गणपती नगरात घडली आहे. १८ नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास कैलास सोनवणे (रा. गणपतीनगर, जळगाव) हे खासगी वाहनचालक असून ते १४ नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांसह आजीच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी कंडारी येथे गेले होते. त्यांच्या शेजारी राहणारे श्यामलाल आहुजा यांना १८ नोव्हेंबर रोजी विलास सोनवणे यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती सोनवणे यांना दिली. त्यानंतर सोनवणे हे घरी आले, यावेळी त्यांना त्यांच्या घरात चोरी झाली असल्याचे लक्षात आले.
चाेरट्यांनी त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून ३० हजार रुपये रोख, १५ हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, टीव्ही, इलेक्ट्रिक मोटार, दोन गॅस हंड्या, पैशांचा गल्ला, साड्या व गौतम बुद्धांची मूर्ती असा ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.