टीनटीन वाजणार : ५० वाहक, चालक साेमवारपासून देणार बससेवा
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संपाविरोधात प्रशासनदेखील आक्रमक झाले असून, विभागात राेजंदारीवर काम करणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नाेटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी नुकत्यात भरती करण्यात आलेल्या ५० प्रशिक्षित वाहक, चालकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, या वाहकचालकांना नियुक्ती देण्यात येणार आहे. सोमवारपासून ते कामावर रुजू होतील अशी माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सविस्तर असे की, एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी उपाेषणाच्या माध्यमातून अघाेषित संपाचे हत्यार उगारले आहेत. ऐन दिवाळीच्या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आदाेलनामुळे एसटी प्रशासनाला काेेट्यवधीचा रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. परिणामी आधीच ताेट्याचा सामना करत असलेल्या एसटी महामंडळाच्या अडचणी अधिक वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संप माेडीत काढण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. १४० हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
तर विभागात राेजंदारीवर काम करत असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नाेटीस देण्यात आली आहे. हे कर्मचारी २४ तासांच्या आत कामावर हजर न झाल्यास त्यांची सेवा समाप्त केली जाणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाच्या या कारवाईमुळे एसटीचा संप अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नव्याने भरती करण्यात आलेल्या ५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पुढील दोन दिवसांत त्यांना नियुक्तीपत्र देऊन एसटीसेवा सुरू केली जाणार असल्याचेही विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.