जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त नागरिकांमध्ये शासकीय योजना, कायदेविषयक जनजागृती होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यावल येथील तहसील कार्यालयात शुक्रवार दि.१२ रोजी सकाळी १०.३० वाजता कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.ए.के. शेख यांनी दिली आहे.
शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्या. एस.डी. जगमलानी, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे आदी उपस्थित राहणार आहेत.
लाभ घेण्याचे आवाहन
याठिकाणी शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल लावण्यात येणार असून यामार्फत शासनाच्या योजनांची माहिती नागरीकांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव ए.ए.के. शेख यांनी केले आहे.