⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

गेस्ट हाऊस, लोकप्रतिनिधी, अत्याचार आणि जुन्या आठवणींना उजाळा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । शहरातील एका गेस्ट हाऊसमध्ये अत्याचार प्रकरण घडले आणि त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याच्या चर्चा रविवारपासून सुरु आहेत. जिल्ह्यातील ज्या दोन लोकप्रतिनिधींचे नाव घेण्यात येत आहे सपशेल नकार दिला असला तरी राज्यभर जळगाव पुन्हा बदनाम होत आहे. पोलिसांच्या मते तक्रारदार समोर आलेले नाही. राज्यभरात बदनामीचे सॉफ्ट टार्गेट जळगाव जिल्हा ठरला आहे. जळगाव गेस्ट हाऊसच्या प्रकरणाने २०११ मध्ये गाजलेले नाशिक गेस्ट हाऊस प्रकरण देखील पुन्हा चर्चीले जात आहे. जळगावच्या प्रकरणाचा काय उलगडा होतो ते येत्या दोन दिवसात झाला नाही तर भविष्यात देखील होईल याची शक्यता नाही.

जळगाव शहरातील रेस्ट हाऊसमध्ये शनिवारची रात्र एका तरुणीसाठी भयानक होती. गेस्ट हाऊसमध्ये तरुणीवर अत्याचार होतो आणि त्याची कुठे तक्रारही नसल्याने शंकेला वाव मिळाला. जळगाव लाईव्हने या प्रकरणाचा शोध घेतला परंतु कुणीही तक्रारदार समोर आली नाही. एकीकडे प्रकरण दाबले जात असल्याची चर्चा होत आहे तर दुसरीकडे नेमके यात कोणत्या लोकप्रतिनिधींचा सहभाग होता याचा देखील शोध घेतला जात आहे. कुणी भाजपकडे बोट दाखविले तर कुणी शिवसेनेकडे. एखाद्या तरुणीवर अत्याचार होणे ही बाब प्रचंड दुर्दैवी असली तरी अद्याप एकही महिला संघटना पुढे आलेली नाही याचे देखील आश्चर्य वाटते. सोमवारी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीने निवेदन दिल्यामुळे त्याच्या पक्षाचा कुणी नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील कोणताच राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी याविषयावर बोलायला तयार नसल्याने ‘ते’ लोकप्रतिनिधी नेमके कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत हा प्रश्न अनुत्तरितच आहे. जळगावातील गेस्ट हाऊसमध्ये चालणारे गैरप्रकार जिल्ह्याला काही नवीन नाही. बऱ्याचवेळ केवळ संबंधाच्या नावाखाली गेस्ट हाऊसला खोली उपलब्ध होते आणि नको त्या पार्ट्या त्याठिकाणी रंगतात. जळगाव जिल्ह्याला लागलेले बदनामीचे ग्रहण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. दर सहा महिन्यांनी काहीतरी नवा विषय समोर येतो आणि जळगाव बदनाम होते. गेस्ट हाऊस अत्याचार प्रकरण आजमितीला खरोखर घडले असेल तर ते जवळपास अतिशय शिताफीने दाबले गेले यात शंका नाही. जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यांच्याकडून सुमोटो सुरु केलेला तपास योग्य पद्धतीने आणि योग्य मार्गाने गेला तर येत्या काही तासात सत्य काय ते समोर येईलच.

जळगाव जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीचे गेस्ट हाऊस प्रकरण देखील २०११ मध्ये असेच गाजले होते. तेव्हा तक्रारदार पीडिता समोर आल्याने आणि गृहमंत्री आर.आर.पाटील असल्याने गुन्हा दाखल होऊन कारवाई देखील झाली होती. जळगाव जिल्ह्यातील सेक्स स्कँडल प्रकरणाची देखील अशीच चर्चा झाली होती. शेवटी निष्कर्ष मात्र काही ठोस निघाले नाही. काही महिन्यांपूर्वी देखील महिला वसतिगृह प्रकरणात जळगावचे नाव राज्यभर बदनाम झाले होते. दोषींना शिक्षा मिळायलाच हवी परंतु त्यात तक्रारदार ठाम असणे आणि तपास योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. जळगावात सध्या सुरू असलेल्या चर्चा या फक्त हवेत फैरी झाडण्याचे काम असून तूर्तास तरी ‘ब’चा ‘बटाटा’ केला जात असल्यासारखे आहे. कुणालाच ठोस माहिती नाही परंतु मिळेल त्या माहितीत आणखी मिरची, मसाला टाकून ते बाहेर पोहचवीत आहेत.