जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । यावल येथील खासगी रुग्णालयात बुधवारी एका २३ वर्षीय विवाहितेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव होत असल्याने गंभीर अवस्थेत तिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता शनिवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान,नातेवाईकांनी पोलिसात तक्रार देण्यास उशीर केल्यामुळे शनिवारी शवविच्छेदन करून एक दिवस उशिरा रविवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
यावल तालुक्यातील चिखली येथील माया सागर सोनवणे (भिल्ल) या २३ वर्षीय महिलेला त्रास होत असल्याने बुधवारी सकाळी यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या ठिकाणाहून तिला हलवण्याचा सल्ला देण्यात आल्याने नातेवाईकांनी यावल येथील खाजगी रुग्णालयात महिलेला भरती केले. या ठिकाणी महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने तिला लगेच जळगाव येथील वैद्यकीय महाविद्याल व रूग्णालयात हलविण्याचे सांगितले.
आशावर्करला सोबत घेत नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता महिलेला जळगाव जीएमसीत दाखल केले. या वेळी महिलेची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी उपचार सुरु केल्यानंतर रक्तस्त्राव थांबण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने शनिवारी दुपारी महिलेचा मृत्यू झाला. यावल येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
संसर्गजन्य आजारामुळे अवयव निकामी
महिलेला संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याने अवयव निकामी झाले होते. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल शवविच्छेदनातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, महिलेचा व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल.
एक दिवस उशिरा मृतदेह ताब्यात
शनिवारी दुपारी महिलेचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी दुपारी १ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांनी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिल्याने एमएलसी दाखल नव्हती तसेच नातेवाईकांनी रुग्णालयाला पत्र देण्यास नकार दिला होता. त्यामुळे एक दिवस मृतदेह रुग्णालयात पडून होता. महिलेचा पती हजर नसल्याने तिच्या भावाने एक दिवस उशीरा तक्रार दिली. नातेवाईकांनी उशीर केल्यामुळे मृतदेह एक दिवस ठेवण्यात आला.