आरोग्याचा वारसा पुढील पिढीला कधी देणार?- डॉ.मुकेश कसबेकर
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव आणि विवेकानंद प्रतिष्ठान संचालित इंग्लिश मिडीयम स्कूल, वाघ नगर आयोजित ‘भारतीय संस्कृतीत धन्वंतरी आणि आरोग्याचे महत्व’ या चर्चासत्रात बोलतांना ‘आरोग्याचा वारसा पुढील पिढीला कधी देणार’? हा गहन प्रश्न आरोग्य भारती पश्चिम क्षेत्र संघटक डॉ. मुकेश कसबेकर यांनी मांडला. सोबत ‘विद्यालय स्वास्थ प्रबोधन’ हे अभियान सर्व विद्यालयांमध्ये सुरु करण्याचे मनोदय आरोग्य भारतीतर्फे करण्यात आले या चर्चासत्रात इंग्लिश मिडीयम स्कूलचे ६० शिक्षक आणि आरोग्य भारतीचे सदस्य उपस्थित होते. यंदा दिवाळीत या शिक्षकाच्या माध्यमातून शाळेतील २ हजार विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्याचा संदेश जाणार आहे.
‘भारतीय संस्कृतीत आरोग्याला सर्वतोपरी मानले आहे’ असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ. पराग जहागीरदार यांनी केले आहे. आयुर्वेदशास्त्र, होमियोपॅथी, अॅलोपॅथी आणि योग यांच्या संगमाने व्यक्ती आजारीच पडू नये तथा रोगी व्यक्तीचे सर्व रोग दूर करण्याची क्षमता आहे असे प्रतिपादन डॉ. लीना पाटील यांनी केले. दि. २ नोव्हेंबर रोजी धन्वंतरी पूजन दिवस आहे. यादिवशी आरोग्य भारतीच्या वतीने संपूर्ण भारतात ‘धन्वंतरी पूजन’ करण्यात येते. जळगाव मध्ये धन्वंतरी आणि आरोग्याचे महत्व समाजातील सर्व स्तरापर्यंत पोचविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते.
सदर चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून जळगाव मधील आयुर्वेदाचार्य डॉ. पराग जहागीरदार, प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील आरोग्य भारतीचे पश्चिम क्षेत्र संघटक डॉ. मुकेश कसबेकर आणि जळगाव शाखेच्या अध्यक्षा डॉ. लीना पाटील उपस्थित होत्या. यावेळी विवेकानंदच्या शिक्षिका सौ. लीना जोशी यांनी सूत्रसंचालन केले, आरोग्य भारतीचे कृणाल महाजन यांनी प्रस्तावना केली तर प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांनी आभार व्यक्त केले.
एक शिक्षक संपूर्ण पिढी घडवितो. समाजात आदर्श निर्माण करण्याचे कार्य शिक्षकच करू शकतो. शिक्षकाने विचार केल्यास आरोग्याचे हे मूलमंत्र अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून एक स्वास्थ समाजाची निर्मिती होऊ शकते आणि आपली येणारी पिढी ही स्वास्थ, विकार रहित आणि सुधृढ होऊन भारताचे उज्ज्वल भविष्य होऊ शकते हा उद्देश घेऊन हे चर्चासत्र शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले होते.
सदर चर्चासत्रासाठी आरोग्य भारतीचे डॉ. पुष्कर महाजन, डॉ. शरयू विसपुते, योग शिक्षिका सौ.रेवती याज्ञिक, डॉ. विवेक जोशी, डॉ. विनीत नाईक यांनी सहकार्य केले.