जळगावसह ९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७७४ कोटीची मदत जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत झालेल्या पूरस्थितीमुळे बाधित 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 774 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण रु 774,15.43 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला. त्यात जळगावसह सोलापूर, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नाशिक या नऊ जिल्ह्यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त यांचेमार्फत हा निधी वितरित करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
दिनांक 21.10.2021 च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तातंरित करण्याबाबत दक्षता घ्यावी. असे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर करण्यात येईल.