जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारी अधिकार्यांवर सुरू होता. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी 22 रोजी दखल घेत पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना पुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्याचा पदभार घेण्याचे आदेश दिले आहेत.
सविस्तर असे की, भुसावळ बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांची शनिवार, 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी तडकाफडकी नियंत्रण कक्षात तात्पुरती बदली करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती. अत्यंत शिस्तबद्ध अधिकार्याच्या बदलीमुळे काहीशी नाराजीही व्यक्त होत होती. नशिराबाद येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याच्या कारणास्तव बदली झाल्याची त्यावेळी चर्चा होती. मात्र, महिना उलटूनही अधिकार्यांची नियुक्ती होत नसल्याने बाजारपेठ पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारी अधिकार्यांवर सुरू होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवार, 22 रोजी यावर दखल घेत निरीक्षक भागवत यांना पुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्याचा पदभार घेण्याचे आदेश दिले आहेत.
आता गुन्हेगारीवर आळा बसण्याची अपेक्षा
शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीत वाढ झाली असून, गावठी कट्टा, गुटखा, व अवैध दारू यावर आता प्रतिबंध लागणे अत्यंत गरजेचे आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात अनुभवी व कर्तव्यदक्ष निरीक्षक भागवत यांची बदली झाल्याने पोलीस दलातून समाधान व्यक्त होत आहे. आगामी काळात गुन्हेगारीवर अंकुश लावणार असून धडक कारवाया लवकरच दिसतील, असे निरीक्षक भागवत म्हणाले.