जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहरासह जिल्ह्यात वाढते कोरोना रुग्ण आणि फुल्ल होत चाललेले रुग्णालयातील बेड हे फारच भयानक आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात बेड शिल्लक नाही आणि खाजगी रुग्णालयांची लाखोंची बिले भरण्याची क्षमता नाही अशा परिस्थितीत काय करावे हे कुणालाही कळत नाही. डॉ.उल्हास पाटील रुग्णालय मात्र गंभीर रुग्णांसाठी तारणहार ठरत आहे. कुठेही बेड शिल्लक नसला तरी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय एका मुख्य बाबतीत कायम बदनाम आहे ते म्हणजे तिथे रुग्ण उपचारार्थ दाखल केला की तो दगावतोच. मुळात जिल्हा सामान्य रुग्णालयात तेच रुग्ण दगावण्याची संख्या जास्त असते जे अतिगंभीर परिस्थिती असताना, खाजगी रुग्णालयाने जगण्याची आशा सोडून दिलेले जे रुग्ण पाठविले जातात ते दगावतात. जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे डॉक्टर आम्ही पाहिले आहे. गेल्या वर्षी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सर्वाधिक गर्भवती महिलांची प्रसूती शासकीय डॉक्टरांनी केली. कोरोनाची दुसरी लाट राज्यात आणि जिल्ह्यात जवळपास येऊन पोहचलीच असून जिल्ह्यातील दररोजच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्याने हजारी पार केली आहे.
जिल्ह्यात दररोज हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत असून त्यात गंभीर रुग्ण देखील अधिक आहे. प्रशासनाकडून रुग्णांसाठी उभारलेल्या यंत्रणा तोडक्या पडू लागल्या असून खाजगी मोफतच्या कोविड सेंटरचे प्रमाण नगण्य आहे. खाजगी काही सेंटरमध्ये केवळ लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयातील उपचाराचे दर शासनमान्य असले तरीही ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. उपचाराचा खर्च आणि औषधींचा खर्च लाखोंच्या घरात सहज पोहचत असल्याने सर्व सामान्यांचे मरणच आहे.
एकीकडे खाजगी रुग्णालयांचे दर खूप असले तरीही त्यांच्याकडे बेड फुल्ल आहेत. बेड मिळविण्यासाठी देखील वशिल्याचा उपयोग करावा लागत आहे. दुसरीकडे जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात बेड संख्या वाढवली तरी ती तोडकी पडू लागली आहे. खाजगी रुग्णालयात जागा नाही, जागा असली तरी गंभीर रुग्णांना थारा नाही अशा परिस्थितीत डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात कोविड रुग्ण जागा उपलब्ध करून दिली जात आहे. गंभीर रुग्णावर तात्काळ उपचार सुरू करून त्याचा बचावासाठी प्रयत्न केले जातात. जिल्हा रुग्णालयाचे उदाहरण दिल्याप्रमाणे काही अति गंभीर रुग्ण दाखल करून घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यास पुन्हा नातेवाईक गोंधळ घालतात हे प्रकार नित्याचे झाले आहे. आपल्या चुका समजून न घेता रुग्णालय प्रशासनावर बोट दाखविल्याने रुग्णालय प्रशासन करीत असलेल्या आजवरच्या चांगल्या कामांवर बोट दाखवला जातो.
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. रुग्णालय प्रशासन, डॉक्टर, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. अनेकांनी तर कोरोनातून बरे होत पुन्हा सेवा देण्यास सुरुवात केली. रुग्णांच्या नातेवाईकांनी या सर्व बाबींचे अवलोकन करणे फार गरजेचे आहे. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने आपल्या रुग्णाला वेळीच दाखल करून घेतले नसते तर तो कधीच दगावला असते याचे भान देखील नातेवाईकांना नसते. जो कुणी चांगले काम करतो त्याच्यावर शिंतोडे उडताच, काही चुका होतातच परंतु त्या दुर्लक्ष करण्यातच आपले भाग्य असते. आज कोरोना रुग्णांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात जी सेवा मिळतेय ती जर उद्या बंद झाली तर मग खाजगी रुग्णालयाचा दरवाजा ठोठावल्याशिवाय पर्याय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे.