जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यात नेहमी नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या भरारी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जाणून घेतली. प्रसंगी शेतकरी संवेदना अभियान अंतर्गत आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देखील करण्यात आली.
जळगाव जिल्ह्याचा प्रशासकीय आढावा घेण्यासाठी महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी गेल्या सात वर्षापासून भरारी फाउंडेशन राबवित असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारासाठी केलेल्या कामाची माहिती दिली. विभागीय आयुक्तांनी गेल्या एक वर्षापासून शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सुरु केलेल्या शेतकरी संवेदना अभियानाची संकल्पना जाणून घेतली.
कार्यक्रमात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला वनिता कडुबा शिंदे रा.वरखेड़ी ता.पाचोरा व रत्नाबाई पाटील रा.टाकली ता.धरणगाव यांना पदमालय फार्मस कंपनी, चोपड़ाचे उद्योजक राहुल पाटील यांच्या माध्यमातून शेतीसाठी बी बियाणे, खते देण्यात आले. तसेच वनिता कडुबा शिंदे या महिलेला झेरॉक्स व प्रिंट मशीन के.के.कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी यांच्यातर्फे देण्यात आले त्यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.