‘ईद- ए- मिलाद’साठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचना जाहीर ; जाणून घ्या काय आहेत?
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद- ए- मिलाद (मिलादुन नबी) शक्यतो घरात राहूनच साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे, की ‘कोविड-19’ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद- ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. हा सण शक्यतोवर घरी राहूनच साजरा करावा. मात्र, मिरवणूक काढावयाची झाल्यास पोलिस प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी. एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एक ट्रकवर जास्तीत जास्त पाच जणांना परवानगी अनुज्ञेय राहील. मिरवणुकीदरम्यान मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतराचे पालन करावे.
मिरवणुकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. मिरवणुकीच्या दरम्यान स्वागतासाठी पेंडॉल बांधण्यासाठी शासनाच्या नियमानुसार संबंधित महापालिका, पोलिस व स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या पेंडॉलमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहित नमुन्यांचे पालन करावे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या शासन आदेशातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचनास परवानगी देण्यात येईल. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावेत. त्याचे केबल टी.व्ही. फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी,
ईद ए मिलादनिमित्त मिरवणुकीच्या मार्गावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ तात्पुरत्या सबील (पाणपोई) लावण्यात येतात. त्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. तेथे पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. तेथे सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात लागू असलेले निर्बंध कायम राहतील. त्यात कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबवावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. या सूचनांच्या व्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित महापालिका, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला असतील.
कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व मिरवणूक सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत आणखी काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेही अनुपालन करणे आवश्यक राहील. या सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहितेतील कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.