जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २४४ कोटींची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात दि.२८ व २९ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बागायती व बहुवार्षिक फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने २४४ कोटी ३० लाख ६१ हजार रुपये इतके अनुदान शासनाकडे मागितले आहे.
जळगाव जिल्ह्यात २८ व २९ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टी होऊन जळगाव, बोदवड, एरंडोल, धरणगाव, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा व भडगाव तालुक्यातील ५३० गावांमधील तूर, मू्ग, उडीद, ज्वारी, सोयाबीन, बाजरी, मका, कपाशी, मका, कांदा, केळी, भाजीपाला, पपई, लिंबू, सीताफळ या पिकांचे नुकसान झाले होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५३० गावांमधील २ लाख ९५ हजार ५०६ हेक्टरवरील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे २ लाख ९१ हजार ८३२ शेतकरी बाधित झाले आहेत. या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २४४ कोटी ३० लाख ६१ हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.