जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात दि. ११ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरूवात होणार असून दि. १८ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. दि. २० रोजी छाननी होणार आहे. दि. २१ पासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत राहणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेतील सभागृहात कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहने आणि विश्रामगृह सहकार विभागाकडून अधिग्रहीत करण्यात आले आहे. बँकेच्या सभागृहातील कार्यालयात निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
बँकेतील संचालकांच्या सध्याच्या स्थितीनुसार जागांचे वाटप व्हावे या फाॅर्म्युल्यावर राष्ट्रवादीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. असे झाल्यास भाजप स्वत:हून सर्वपक्षीय पॅनलमधून बाहेर पडेल, अशी शक्यता आहे.राष्ट्रवादी, काँग्रेस अाणि शिवसेना या तीनही पक्षांचे एकत्र पॅनल तयार करावे, अशा वरिष्ठांच्या सूचना असल्याने शुक्रवारी गुलाबराव देवकर वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादीची बैठक पार पडली.
दरम्यान, आज शनिवारी बँकेच्या पॅनलसाठी तयार केलेल्या काेअर कमिटीची बैठक हाेणार असून त्यात जागा वाटपाचा निर्णय हाेईल. यात राष्ट्रवादीकडून १० जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.