जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये जळगाव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले.
शुक्रवार दि.८ ऑक्टोबर रोजी काँग्रेस भवन येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे आ. शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, काँग्रेसचे महानगराध्यक्ष श्याम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक लाडवंजारी, योगेश देसले, काँग्रेसचे राज्य पदाधिकारी विनोद कोळपकर, जिल्हा सरचिटणीस जमिल शेख, जिल्हा पदाधिकारी डी.जी. पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आ. शिरीष चौधरी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना बेपर्वापणे चारचाकी वाहनाखाली चिरडण्याची घटना घडली आहे. या घटनेत एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलासह अन्य दोषी संशयितांना उत्तर प्रदेशातील भाजपशासित सरकार वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. लखीमपूर खिरी घटनेचा निषेध म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बंदची हाक दिली आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्लक्ष करीत आहेत. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीखाली शेकऱ्यांना चिरडून टाकण्याचे काम अत्यंत निंदनीय आहे. त्यांना या घटनेचे गांभीर्य नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. लखीमपूर खिरी येथील घटनेत दोषी असलेल्या आरोपीना शिक्षा झाली पाहिजे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर व्हावा, त्यांना व त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा अशी मागणी विष्णू भंगाळे यांनी यावेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविंद्र पाटील म्हणाले की, उत्तर भारतातील शेतकरी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी गेल्या ९ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. भाजप सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रत्यन झाला. साम, दाम, दंड, भेद वापरून देखील आंदोलन संपत नसल्याने दहशतीद्वारे हे आंदोलन संपविण्याचा घाट घातला जात असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी तिनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.