⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | कर्नाटकात व्यापाऱ्याची ६ लाखात लूट, गुन्ह्याचे जळगाव कनेक्शन

कर्नाटकात व्यापाऱ्याची ६ लाखात लूट, गुन्ह्याचे जळगाव कनेक्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । कर्नाटक राज्यात गेल्या महिन्यात एका व्यापाऱ्याची ६ लाखात लूट करण्यात आली होती. दरम्यान, गुन्ह्यात नवीन वळण आले असून गुन्ह्याचे यावल कनेक्शन स्पष्ट झाल्यानंतर गुरूवारी कर्नाटक पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शासकीय कार्यालयात कर्मचारी म्हणून असलेल्या कर्मचार्‍याच्या मुलास ताब्यात घेतले तर उभयंतांच्या घरात असलेल्या अन्य एक संशयीत पोलिसांचा ताफा पाहून पसार झाला.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आदित्य सत्यवान पवार असे आहे तर शिवकुमार हा पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्यात वाघझिरा आश्रम शाळेत अधीक्षिका असलेल्या तरुणीचा मोबाईलचा वापर झाल्याने या तरुणीच्या देखील अडचणीत वाढ झाली आहे.

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील शांतापूर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या महिन्यात 22 सप्टेंबर 2021 रोजी पाच जणांच्या टोळक्याने एका व्यापार्‍याचे सहा लाख रुपये लुटून पळ काढला. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी तीन संशयीतांना अटक केली होती तर त्यातील दोन संशयीत आरोपी हे यावल शहरात असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली. एक संशयीत एका तरुणीच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरूवारी पहाटे कर्नाटक पोलिसांचे पथक यावलमध्ये धडकले.

पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सुशील घुगे, राजेश वाढे, भुषण चव्हाण, राहुल चौधरी, अशोक बाविस्कर आदींच्या पथकाने वाघझिरा आश्रमशाळेत अधीक्षक असलेल्या तरुणीचा शोध सुरू केल्यानंतर ही तरुणी यावल बसस्थानकावर असल्याचे कळताच पथकाने धाव घेतली असता तरुणीसोबत पोलिसांना हवा असलेला तरुण आदित्य सत्यवान पवार देखील असल्याचे दिसताच त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. विशेष म्हणजे दुसरा हवा असलेला संशयीत शिवकुमारदेखील आदित्य पवारच्या घरात आश्रयास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्यादिशेने गेले असता त्याने पळ काढला.

आदित्य पवार हा यावल प्रकल्प कार्यालयातील ग्रंथपाल सत्यवान पवार यांचा मुलगा आहे. ते मुळचे सोलापूरचे रहिवासी असून कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासात आदित्य पवारने वाघझिरा आश्रमशाळेच्या अधिक्षीका सृष्टी निकाळजेचा मोबाईल गुन्ह्यात वापरला तर शिवाय तरुणीच्या फोन पे वर 50 हजारांची रक्कम देखील टाकल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.