लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । ‘जय जवान, जय किसान’चा मंत्र देणारे भारताचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तसेच सत्य अन् अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास तसेच प्रतिमेस माल्यार्पण करून आज शनिवार, दि.2 ऑक्टोबर 2021 रोजी जळगाव शहरातील विविध कार्यक्रम, उपक्रमांतर्गत महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी विनम्रपणे अभिवादन केले. याप्रसंगी महापालिकेसह शहरात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत स्वच्छता अभियान, महापालिका अधिकारी, कर्मचार्यांचा सत्कार, ‘कोविड-19’अंतर्गत महापालिका अधिकारी, कर्मचार्यांचे लसीकरण, जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शहरात काढण्यात आलेली रॅली तसेच पुतळ्यास माल्यार्पण, प्रतिमापूजन आदी कार्यक्रम झाले.
टॉवर चौकात शास्त्रीजींना अभिवादन
जळगाव शहरातील टॉवर चौकात असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास सकाळी साडेनऊच्या सुमारास महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महापालिका प्रभाग अधिकारी राजेंद्र पाटील, महापौरांचे स्वीय सहाय्यक नितीन पटवे, कोल्हे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
गांधी उद्यानात महात्मा गांधींना माल्यार्पण
महात्मा गांधी उद्यानातील महात्मा गांधींच्या पुतळ्यास सकाळी दहाच्या सुमारास महापौर जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले. महापालिका प्रभाग अधिकारी राजेंद्र पाटील, महापौरांचे स्वीय सहाय्यकनितीन पटवे, कोल्हे, योगेश वाणी यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
विधी सेवा प्राधिकरणातर्फे गांधीजींना अभिवादन, रॅली
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, भारत सरकार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये आज शनिवार, दि.2 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबर 2021 दरम्यान पॅन इंडिया आऊटरीच प्रोग्रॅमचे रॅलीद्वारे उद्घाटन करण्यात आले. संबंधित रॅलीला जिल्हा व सत्र न्यायालय जळगाव येथून सकाळी सव्वादहाच्या सुमारास सुरूवात होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानात समारोप करण्यात आला. याप्रसंगी उद्यानातील गांधीजींच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादनही करण्यात आले. याप्रसंगी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.ए. देशपांडे, जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे,आर. एन. हिवसे, डी.ए. काळे, व्ही.बी. बोहरा, दिवाणी न्यायाधीश सौ.वंदना जोशी, एस.पी.सय्यद,जे.बी.पवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.ए.ए.के. शेख, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व सचिव, एस.एस.मणियार लॉ कॉलेज व गोदावरी लॉ कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेत सफाईमित्रांसह महापौरांचा सन्मान
भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आज शनिवार, दि.2 ऑक्टोबर 2021 रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त श्री.श्याम गोसावी, पवन पाटील यांच्या हस्ते महापालिकेतील दुसर्या मजल्यावरील सभागृहात सकाळी साडेदहाच्या सुमारास निवडक 25 सफाई कर्मचार्यांचा तसेच अधिकाऱ्यांचाही “सफाईमित्र” म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच ‘महापौर सेवा कक्षा’तर्फे शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेसह विविध तक्रार निवारण करण्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांचा महापालिका आयुक्त.सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.