जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । शहरातील टॉवर चौकात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर मुरलीधर निकुंभ हे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नातेवाईकांना सोडून पोलीस ठाण्यात येत असताना टॉवर चौकात उभे असलेल्या तरुणांना त्यांनी का उभे आहेत याचा जाब विचारला होता. विचारणा केल्याचा राग आल्याने दोन तरुणांनी त्यांना बेदम मारहाण केली होती.
घटनेनंतर सर्वांना पोलीस ठाण्यात आणले असता पोलीस ठाण्यात आल्यावर मोठा जमाव वाढू लागला. यावेळी पोलीस ठाणे अंमलदार पोलीस नाईक रविंद्र पाटील यांना शिवचरण कन्हैय्यालाल ढंढोरे, संदीप शिवचरण ढंढोरे, विलास मधुकरराव लोट, नितीन जावळे व वाद घालणाऱ्या इतरांनी त्यांना अर्वाच्य भाषेत बोलून अरेरावी केली. तसेच महिला पोलीस कर्मचारी किरण मालवणकर यांना वाईट साईट बोलून तुम्ही पोलीस फार मातले आहे, तुम्हाला पाहावे लागेल. मी माजी नगरसेवक आहे, माझी पॉवर तुम्हाला दाखवतो असे म्हणून धमकी दिली.
पोलीस ठाण्यात जमाव आणि वाद वाढल्याने सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, अर्चित चांडक हे आरसीपी पथक आणि क्यूआरटी टीमसह पोहचले व गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेऊन जमावाला पंगविले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांच्या फिर्यादीवरून अमन उर्फ आशुतोष ईश्वर ढंढोरे, रणवीर ढंढोरे, शिवचरण कन्हैय्यालाल ढंढोरे, संदीप शिवचरण ढंढोरे, विलास मधुकरराव लोट, नितीन जावळे यांच्यासह ४ अनोळखी जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी रात्रीच गोंधळ घालणाऱ्या संदीप शिवचरण ढंढोरे व विलास मधुकरराव लोट यांना अटक केली होती. तर शिवचरण कन्हैय्यालाल ढंढोरे हे वैद्यकीय उपचाराकामी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल आहेत. शुक्रवारी दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील अनिल गायकवाड यांनी इतर संशयितांना अटक करणे बाकी असून लोकसेवकावर हल्ला करणे, संशयितांचा पूर्व इतिहास तपासणे कामी ७ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोघांना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.