जळगाव जिल्हा

धक्कादायक : के.टी.वेअर बंधाऱ्यात बुडून चिमुकल्या भाऊ-बहिणीचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । आई-वडील बाहेरगावी वर्षश्राद्धाला गेले असताना घरापासून जवळच असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यात बुडून चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जामनेर तालुक्यातील जांभूळ येथे रविवारी दि.१९ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

जामनेर तालुक्यातील गंगापूर येथील मूळ रहिवासी असलेले नितीन एकनाथ जोशी आणि गोरख एकनाथ जोशी हे दोघे सख्खे भाऊ जांभूळ गावापासून जवळच थोड्या अंतरावर राहतात. दोन्ही भाऊ मजुरी तसेच भिक्षुकी करून आपला चरितार्थ चालवितात.

नितीन जोशी हे रविवार दि.१९ रोजी शेंगोळा ता.जामनेर येथे वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी पत्नीसह गेले होते. दुपारच्या सुमारास त्यांची ९ वर्षांची मुलगी पायल नितीन जोशी आणि त्यांचे भाऊ गोरख जोशी यांचा ६ वर्षांचा मुलगा रुद्र गोरख जोशी हे दोघे चुलत बहीण भाऊ खेळत खेळत घरापासून जवळच अंतरावर सुभाष रामदास शिंदे यांच्या शेताजवळ असलेल्या केटीवेअर बांधापर्यंत गेले.

खेळता खेळता दोघांचा तोल गेल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. आज रविवार, गणेश विसर्जन त्यात दुपारची वेळ असल्याने चिमुकल्यांना वाचविण्यासाठी त्यावेळी कुणीही उपस्थित नव्हते. सहज म्हणून मयत रुद्रचे मामा मुकुंदा हरी जोशी केटीवेअर बांधापाशी आल्यावर त्यांना दोघा मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी लगेचच मुलांच्या आई-वडिलांशी संपर्क केला.

चिमुकल्या पायल आणि रुद्रचे मृतदेह पाहून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे , हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही दुर्दैवी चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोघा बहिण भावावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गणपती विसर्जनाच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जांभूळ गावावर शोककळा पसरली आहे.

चिमुकला ६ वर्षीय रुद्र दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. तो जांभूळ येथील अंगणवाडीत शिकत होता. मयत पायल जांभोळ येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीत होती. पायलच्या पश्च्यात तीन बहिणी आई-वडील असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button