बेरोजगारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या संकेतस्थळावर बेरोजगारांनी नाव नोंदणी करावी. तसेच विभागातर्फे होणाऱ्या ऑनलाइन रोजगार मेळाव्यांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
जिल्ह्यातील उमेदवारांची नाव नोंदणी 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरू झाली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नाव नोंदणी करू शकतात.
उमेदवारांनी ऑनलाइन नाव नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या यूजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता यावा म्हणून अल्पसंख्यांक उमेदवारानी देखील रोजगार / स्वयंरोजगांराच्या संधी व सुविधांचा लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाइन नाव नोंदणी करणे अपेक्षित आहे.
कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना देखील नाव नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन व साहाय्य कार्यालयाकडून करण्यात येते. या कार्यालयामार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच अल्पसंख्याक उमेदवारांसाठी देखील आयोजित होणाऱ्या मेळाव्याचा लाभ घ्यावा.
याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15) यावेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 यावर संपर्क साधावा.