जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२४ । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका असूनही त्यापूर्वी भुसावळ शहरातील गांधी पुतळा ते शहर पोलिस ठाण्याचा रस्ता खोदून तयार केला जात आहे. यामुळे मिरवणुकीत अडथळे येतील. डॉ. आंबेडकर जयंती झाल्यावर रस्त्याचे काम करावे, अशी मागणी करत आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी अर्धा तास गांधी पुतळा चौकात रास्ता रोको करून समिती अध्यक्षांनी चक्क ट्रकच्या चाकाखाली डोके ठेवल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. उत्सव समिती अध्यक्ष गणेश सपकाळे (भुरा) तसेच कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या मार्गावर सुशोभीकरण व रोषणाईचे काम करीत असताना अचानक दोन ट्रॅक्टर ट्रॉली व दोन जेसीबी मशीन घेऊन चत्रभूज कन्ट्रक्शनचे मक्तेदार योगेश पाटील यांचे अभियंता तुषार वाघुळदे व जीवन सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी पुतळा ते महाराणा चौकमधील दुभाजक रस्त्याला खोदकाम करण्याचे काम करीत असताना.
उत्सव समिती अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी खोदकाम करण्यासंदर्भात संबंधितांना विचारणा केली असता या मार्गावरील दुभाजक रस्ता काॅक्रिटीकरणाच्या कामाला वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत एक कोटी साठ लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. हे काम निधीअभावी रखडले असल्याने पूर्ण होऊ शकले नाही. मात्र दहा टक्के निधी उपलब्ध झाल्याने कामास सुरवात केल्याचे चत्रभुज कन्ट्रक्शनचे मक्तेदार योगेश पाटील यांनी सांगितले.
रस्त्याचे खोदकाम शनिवारी (ता. ६) जेसोबी मशीनच्या साह्याने करीत असताना पथदीपाची केबल तुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये अक्रोश निर्माण झाला. रस्त्याचे काम सुरू झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मार्ग बंद करण्यात येईल, असा रोष मनात धरून उत्सव समिती अध्यक्ष गणेश सपकाळे व कार्यकर्त्यांनी चक्क गांधी पुतळा चौकात रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली
अखेर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी घटनास्थळी पोहचून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रशेखर तायडे व मक्तेदारी योगेश पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व खोदकाम करण्यात आलेला रस्ता पूर्ववत करून देण्यास सांगितल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.